महिलेची निर्घृण हत्या

By Admin | Updated: August 28, 2016 02:35 IST2016-08-28T02:35:26+5:302016-08-28T02:35:26+5:30

शेतामध्ये पतीसाठी जेवणाचा डबा पोहोचविण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेली महिला अचानक बेपत्ता झाली.

The brutal killing of the woman | महिलेची निर्घृण हत्या

महिलेची निर्घृण हत्या

सहा दिवसांपासून होती बेपत्ता : उबाळी शिवारात आढळला मृतदेह
कळमेश्वर : शेतामध्ये पतीसाठी जेवणाचा डबा पोहोचविण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेली महिला अचानक बेपत्ता झाली. याबाबत कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलीस बेपत्ता महिलेचा शोध घेत होते. दरम्यान, शनिवारी उबाळी शिवारात सदर बेपत्ता महिलेचा मृतदेह एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यावरून सदर महिलेची निर्घृण हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिससरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी सुमारे पाच हजार नागरिकांनी गर्दी करीत आरोपीच्या अटकेची मागणी केली.
कल्पना प्रभाकर मिलमिले (४०, रा. उबाळी, ता. कळमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, कल्पना मिलमिले ही महिला सोमवारी (दि. २२) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ३ किमी अंतरावरील शेतामध्ये पतीला जेवणाचा डबा पोहोचविण्यासाठी निघाली होती. दरम्यान रस्त्यातील कटरे फार्म हाऊसजवळ तेथील नोकराला ती दिसली. त्यानंतर ती झाडाआड गेल्यानंतर गायब झाली. ही बाब उघड होताच, कळमेश्वर पोलीस ठाण्यात तिच्या गायब होण्याची तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.
दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास उबाळी गावकरी शेतात जात असताना, शिवारातील रस्त्यात दुर्गंध सुटल्याने गावकऱ्यांनी परिसराची पाहणी केली. अशात सदर महिलेचा कुजलेला मृतदेह एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत माहिती पसरताच घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
याबाबत माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर, ठाणेदार संजय बहादुरे यांनी घटनास्थळ गाठले. पाहणीदरम्यान, महिलेकडील जेवणाचा डबा दूरवर आढळून आला. शिवाय, सदर महिलेस ५० ते ६० फुटावरुन फरफटत नेल्याने परिसरात रक्ताचे डाग आढळून आले. महिलेचा गळा कापून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे मृतादेहावरून ध्यानात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी प्रचंड गर्दी झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कळमेश्वर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांसह सावनेर, खापा, केळवद पोलिसांची कुमक पाचारण करुन घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला. यावेळी सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर, ठाणेदार संजय बहादुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस गर्दी नियंत्रित करीत होते. (तालुका प्रतिनिधी)

गळा कापून केली हत्या
सदर महिला सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते. दरम्यान, शनिवारी उबाळी शिवारातच तिचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचा गळा कापून हत्या केल्याचे घटनास्थळावरील पाहणीत आढळून आले. शिवाय, आरोपीने तिचा मृतदेह फरफटत नेत झाडावर फेकून दिला, असावा, असाही अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.
उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा
सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात न पाठविता. नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तिची हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली, याचा उलगडा अद्याप झाला नसून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. उत्तरीय तपाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात.
उबाळीला आले छावणीचे स्वरुप
महिलेच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे हजारो नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याने तणावाची स्थिती उद्भवली. अनुचित प्रकार टाळण्याच्या हेतूने कळमेश्वर पोलिसांनी अतिरिक्त पोलीस कुमक तैनात केली. यामुळे उबाळी गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले.

Web Title: The brutal killing of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.