ताजुद्दीन बाबांच्या जयंतीला दिला बंधुभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:39+5:302021-02-05T04:47:39+5:30

- मजावर चढवली चादर, प्रसाद म्हणून वाटला केक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ...

Brotherhood given to Tajuddin Baba's birthday | ताजुद्दीन बाबांच्या जयंतीला दिला बंधुभाव

ताजुद्दीन बाबांच्या जयंतीला दिला बंधुभाव

- मजावर चढवली चादर, प्रसाद म्हणून वाटला केक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या पर्वावर शहरात बंधुभाव प्रकर्षाने दिसून येत होता. सर्व धर्मपंथीयांनी ताजुद्दीन बाबांची जयंती जल्लोषात साजरी केली. मोठा ताजबाग अर्थात ताजाबाद शरिफमध्ये भक्तांची गर्दी उसळली होती. चौकाचौकांत हा जल्लोष दिसून येत होता. जागोजागी केक कापण्यात आला, महाप्रसादाचे आयोजन झाले आणि मिठाई वितरणाने जन्मोत्सव साजरा झाला.

कोरोना नियमांमुळे ताजाबाद ट्रस्टने कोणत्याच जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते; परंतु आस्थेने बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. त्याअनुषंगाने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन ट्रस्टने केले होते. ट्रस्ट कार्यालयातून जयंती पर्वावर नमाज वाचण्यात आली आणि औपचारिक संदल व चादर दरग्यावर चढविण्यात आली. यावेळी युसुफ इक्बाल ताजी यांचे फर्जंद सय्यद तालिब ताजी व सय्यद जरबीर ताजी यांच्या हस्ते संदल व चादर मजार-ए-पाक परिसरात सादर करण्यात आली. त्यानंतर फातिहा वाचण्यात आली. यावेळी ट्रस्टचे प्रशासक गुणवंत कुबडे, ताजाबाद शाही मशिदीचे इमाम खुर्शीद आलम, ट्रस्टचे केयरटेकर शहजादा खान, गुलाम मुस्तफा, अमानउल्लाह खान उपस्थित होते. मजावर माथा टेकण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासह गिरीश पांडव व आ. मोहन मते आले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्याअनुषंगाने ताजाबाद परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे.

यशोधरानगर चौकातही साजरा झाला जन्मोत्सव

बाबा ताजुद्दीन जयंतीचा पर्व यशोधरानगर चौकातही साजरा झाला. यावेळी बाबांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य अकादमीच्या माजी सदस्य प्राचार्य डॉ. निर शबनम (निर्मला चांदेकर) यांच्या हस्ते केक कापण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस सेवादलचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनिल वाघ होते. यावेळी बेचू सेठ, मोहम्मद वाजिद, हाफिज अब्दुल बासित, हबीब खान उपस्थित होते.

......

Web Title: Brotherhood given to Tajuddin Baba's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.