दलाल, गुन्हेगारांवर कडक कारवाई करा

By Admin | Updated: November 23, 2015 02:34 IST2015-11-23T02:34:28+5:302015-11-23T02:34:28+5:30

गुन्हेगारांचे शहर, अशी नागपूरची प्रतिमा बनू नये. त्यासाठी दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा ...

Brokers, crack down on criminals | दलाल, गुन्हेगारांवर कडक कारवाई करा

दलाल, गुन्हेगारांवर कडक कारवाई करा

मुख्यमंत्र्यांनी खडसावले : नागपूरची प्रतिमा गुन्हेगारांचे शहर अशी बनू नये
नागपूर : गुन्हेगारांचे शहर, अशी नागपूरची प्रतिमा बनू नये. त्यासाठी दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा आणि पोलीस ठाण्याच्या परिसरात घुटमळणाऱ्या दलालांना हुसकावून लावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शहर पोलीस दलाला दिले.
उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी पोलीस जिमखान्यात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव आणि अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्यासह शहर दलातील बहुतांश वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
उपराजधानीत घडणारे खून, खुनाचे प्रयत्न, बलात्कार, दरोडे, अपहरण, जमिनी बळाकावणे, फसवणूक करणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने होणारी खंडणी वसुली आदी गंभीर गुन्ह्यांमुळे वेगवेगळ्या अफवा पसरून नागपूरची प्रतिमा ‘गुन्हेगारांचे शहर‘ अशी होत चालली आहे.
एकीकडे पोलीस आयुक्त नागपुरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना पुढे करीत आहेत. मात्र, काही अधिकारी या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी दलालांच्या दडपणात काम करीत असल्यामुळे गुन्हेगार सोकावले आहेत. गुन्हेगारी, क्रिकेट बेटिंग, अवैध धंद्यात गुंतलेले चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांवर ते आरोप लावून दडपण आणण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांची कोंडी होत असून, गुन्हेगार, दलाल निर्ढावले आहेत.
हा एकूणच प्रकार लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलीस जिमखान्यात आयोजित बैठकीत त्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खंबीरपणे काम करण्याची गरज विशद केली. शहरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा, असे आदेश देतानाच पोलीस ठाण्याच्या स्तरावर सक्रिय असलेल्या दलालांची लुडबूड बंद करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.गुन्हेगारांवर कडक कारवाई करतानाच शहरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना पोलिसांबद्दल आदर वाटेल,अशी भूमिका घेण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी विशद केली. गुन्हेगारी कमी झाल्याचे आकडे महत्वाचे नाही. तर, जनभावना महत्वाची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जनतेत विश्वास निर्माण करण्यासाठी घटनास्थळी तातडीने पोहचण्याचे तसेच रात्रीची गस्त वाढविण्याचेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (प्रतिनिधी)

आत्मविश्वास दुणावला
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. बोलण्याची संधी मिळाल्यामुळे पोलीस निरीक्षकांनी समस्यांचा पाढा वाचला. काम करताना येणाऱ्या अडचणीही सांगितल्या. त्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘स्मित हास्य करीत‘ पोलिसांच्या अडचणी दूर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, थेट मुख्यमंत्र्यांनीच दलालांना दूर करण्याचे खणखणीतपणे आदेश दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांचा विश्वास दुणावला आहे. राज्याचे प्रमुखच खंबीर भूमिका घेण्याचे सुचवित असल्याने दडपणात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही बळ मिळाले आहे.

Web Title: Brokers, crack down on criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.