तुटली का रे...
By Admin | Updated: September 20, 2014 01:57 IST2014-09-20T01:57:45+5:302014-09-20T01:57:45+5:30
शिवसेना-भाजप यांची २५ वर्षापासूनची युती तुटणार,

तुटली का रे...
भाजप-सेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ : मुंबईकडे लक्ष, दिवसभर विचारणा
नागपूर: शिवसेना-भाजप यांची २५ वर्षापासूनची युती तुटणार, अशा बातम्या शुक्रवार सकाळपासूनच वृत्तवाहिन्या देऊ लागल्याने अस्वस्थ झालेले दोन्ही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते दिवसभर युतीच्या भवितव्याबाबत मुंबईतील नेत्यांशी संपर्कात होते. ‘तुटली का ?’असा सवाल फक्त युतीतीलच कार्यकर्ते विचारत होते असे नव्हे तर आघाडीतूनही याबाबत विचारणा होत होती.
जागा वाटपाच्या मुद्यावरून दोन्ही पक्षात गेल्या एक आठवड्यापासून असलेला तणाव काही दिवसात अधिक वाढला. युतीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला असतानाच शुक्रवारी सकाळपासूनच युती तुटली अशा बातम्या वृत्तवाहिन्या प्रश्नार्थक चिन्ह लावून देऊ लागल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची अस्वस्थता अधिक वाढली. शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या एक दिवस आधी अशी स्थिती निर्माण झाल्याने युती तुटली तर पुढे काय यावरही चर्चा सुरू झाली. भाजपमधील स्थानिक नेते प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे हे मुंबईत असल्याने शिवसैनिक त्यांच्याशी संपर्क ठेवून होते. काय झाले, युती राहणार की भंगणार, असा सवाल दर तासागणिक कार्यकर्ते परस्परांशी करीत होते. मुंबईतील नेत्यांशी बोलणी होत होती. मात्र दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत संदिग्ध उत्तरे मिळत असल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आणखी वाढत चालली होती. सायंकाळ नंतर हा प्रकार किंचित निवळला. मुंबईत गेलेले स्थानिक नेते बोलू लागले. अद्याप स्थिती हाताबाहेर गेली नाही, काळजी करू नका असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. मात्र त्याच वेळी युती होणारच असे ते स्पष्टपणे सांगतही नव्हते. त्यामुळे सायंकाळपर्यंत तरी ‘तुटली का रे’ यावरील उत्तर सध्या तरी नाही एवढेच होते. (प्रतिनिधी)
सन्मानजनक तोडगा काढावा
महायुती कायम राहावी ही भाजपची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र शिवसेनेने त्यांच्या भूमिकेत थोडा बदल करण्याची गरज आहे. भाजपच्या शक्तीत झालेली वाढ त्यांनी मान्य करावी आणि थोडं मोठ मन करावे. भाजप युतीसाठी नेहमीच अनुकूल आहे.
कृष्णा खोपडे, शहर अध्यक्ष, भाजपा
स्थिती निवळेल
भगव्या झेंड्याखाली काम करणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे युतीशी भावनिक संबंध जुळले आहेत. सेना आणि भाजप हे भावंडाप्रमाणे आहेत. त्यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नाही. त्यामुळे परिवर्तनासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जातील.
शेखर सावरबांधे
जिल्हा प्रमुख, शिवसेना