ब्रॉडगेज मेट्रोचा प्रवास एसी बसपेक्षा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:43+5:302021-07-17T04:07:43+5:30

मोरेश्वर मानापुरे नागपूर : वातानुकूलित ब्रॉडगेज मेट्रोचे नागपूर ते वर्धा तिकिटाचे दर जवळपास ६० ते ७० रुपये राहणार असून ...

Broad gauge metro travel is cheaper than AC bus | ब्रॉडगेज मेट्रोचा प्रवास एसी बसपेक्षा स्वस्त

ब्रॉडगेज मेट्रोचा प्रवास एसी बसपेक्षा स्वस्त

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : वातानुकूलित ब्रॉडगेज मेट्रोचे नागपूर ते वर्धा तिकिटाचे दर जवळपास ६० ते ७० रुपये राहणार असून ते एसी बसच्या तिकिटापेक्षा कमीच असेल. मेट्रोचा वेग ताशी १०० किमीपेक्षा जास्त असल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैशांची निश्चितच बचत होणार आहे. या शिवाय चारही कॅरिडोरमध्ये प्रवाशांना आर्थिक फायदा तर स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.

ब्रॉडगेज मेट्रोच्या ५ किमी प्रवासाकरिता २० रुपये निर्धारित करण्यात आले आहेत. पुढे हे दर वाढू शकतात. दुसरीकडे भारतीय रेल्वेच्या एक्स्प्रेस रेल्वेचे नागपूर-वर्धा तिकिटाचे एसी थ्री टायर दर जवळपास ५४५ रुपये आणि स्लीपर कोचचे १८० रुपये आहेत. तुलनात्मकरीत्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचे नागपूर ते वर्धेचे तिकीट १०५ रुपये, खासगी बसचे १५५ रुपये आणि भारतीय रेल्वेने ७५ रुपये खर्च येतो. हे तिकीट लॉकडाऊन पूर्वीचे असून सध्या तिकीट दर वाढले आहे. त्यामुळेच आर्थिक बचतीसाठी ब्रॉडगेज मेट्रो लवकरच रुळावर धावावी, अशी मागणी लोकांकडून होऊ लागली आहे. वर्ष २०२१ मध्ये वर्धा मार्गावर दररोज ५,६६९, नरखेड २,६१६, रामटेक ३,९२९ आणि भंडारा रोडवर २,५५६ अर्थात दररोज एकूण १४,७०० प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती एका अभ्यासातून पुढे आली आहे. पुढे प्रवासी संख्या वाढल्यास मेट्रोला जास्तीचे कोच लावून अथवा नवीन मेट्रो रेल्वे ब्रॉडगेजवर चालविण्याची योजना आहे.

प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यानंतर सामान्य लोकांना याचा काय फायदा होईल, हेसुद्धा पाहावे लागेल. या संदर्भात अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. प्रवासी आणि व्यापाऱ्यांना होणारा फायदा प्रकल्प प्रत्यक्षपणे सुरू झाल्यानंतरच दिसून येणार आहे.

(उद्याच्या अंकात : चार कॅरिडोरसह भविष्यात कुठे धावणार ब्रॉडगेज मेट्रो)

----------

एकाचवेळी ७५० प्रवाशांची सोय

- आठ डब्याच्या ब्रॉडगेज मेट्रोमध्ये दोन डब्यातून मालाची वाहतूक आणि सहा डब्यातून प्रवाशांची ये-जा राहणार आहे. एका ट्रेनमधून एकाचवेळी ७५० प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रारंभी नागपूर-वर्धा ब्रॉडगेज मेट्रोचा ७८.८ किमी मार्गाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बसने दोन तास लागणारे नागपूर-वर्धेचे ७८.८ किमी लांब अंतर मेट्रो केवळ ४५ मिनिटात पूर्ण कापणार आहे. शिवाय प्रवाशांना तिकिटांचे भाडे २० ते ३० टक्क्यांनी कमी लागणार आहे.

---------

असे असतील स्टेशन

- नागपूर-वर्धा कॅरिडोरमध्ये १२ स्टेशन, नागपूर-रामटेक ६ स्टेशन, नागपूर-नरखेड १० स्टेशन आणि नागपूर-भंडारा रोड कॅरिडोरमध्ये ९ स्टेशन राहणार आहे. प्रत्येक स्टेशनवर एक मिनिटे मेट्रो थांबणार असून या वेळेत प्रवासी व मालाची चढउतार करावी लागेल. नागपूर-वर्धा मार्गावर नागपूर जंक्शन, अजनी, खापरी, गुमगांव, बोरी, बुटीबोरी, बोरखेडी, सिंदी रेल्वे, तुळजापुर, वरूड, सेवाग्राम आणि वर्धा स्टेशनचा सहभाग असून दिवसभरात मेट्रोच्या एकूण १० फेऱ्या होणार आहेत. प्रकल्पाचे संचालन करण्यासाठी स्पेशल पर्पज कंपनीची (एसपीसी) स्थापना करण्यात येणार आहे.

Web Title: Broad gauge metro travel is cheaper than AC bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.