वेणा नदीवरील पूल धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST2020-12-25T04:07:57+5:302020-12-25T04:07:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गुमगाव : परिसरातील वागधरा व धानोली गावांना जोडणाऱ्या वेणा नदीवरील पुलाचे सिमेंट जागोजागी उखडले असून, ...

वेणा नदीवरील पूल धाेकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
गुमगाव : परिसरातील वागधरा व धानोली गावांना जोडणाऱ्या वेणा नदीवरील पुलाचे सिमेंट जागोजागी उखडले असून, पुलावरील स्लॅबच्या सळाकीही अनेक ठिकाणी उघड्या पडल्या आहेत. शिवाय, पुलाच्या दाेन्ही बाजूने संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. परिणामी या पुलावरील प्रवास धोकादायक बनला आहे.
ग्रामीण पायाभूत विकास निधीतून धानोली (गुमगाव) येथे वेणा नदीवर सहा वर्षापूर्वी हा पूल बांधण्यात आला. गुमगाव-डोंगरगाव मार्गावरील टी-पॉईंट ते वागधरा -धानोलीमार्गे पुढे गुमगाव-सालईदाभा, बुटीबोरी व हिंगणा या दोन्ही एमआयडीसीकडे हा शॉर्टकट मार्ग जात असल्याने यावरुन रहदारीचे प्रमाण अधिक असते. वाहनांची वर्दळ या पुलावरुन सतत सुरु असते. त्यातच गुमगाव येथील वेणा नदीवरील पुलाचे काम अर्धवट पडून असल्याने सर्वच अवजड वाहतूक धानोलीमार्गे याच पुलावरून वळवली आहे.
या पुलावरील सिमेंट जागोजागी उखडले असून, स्लॅबवरील सळाकी कित्येक ठिकाणी उघड्या पडल्या आहेत. विशेष म्हणजे, कठड्याविना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडावा लागत आहे. बंधाऱ्यावरील दरवाजे बंद केल्याने या पुलाखालील पाण्याची पातळीसुद्धा वाढली आहे. छोटी-मोठी दुर्घटना या पुलावरील नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावर सिमेंट काॅक्रिटीकरण करुन तातडीने दुरुस्ती करावी तसेच संरक्षक कठडेसुद्धा लावण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.