लाचखोर पोलिसांना अटक
By Admin | Updated: August 27, 2016 02:33 IST2016-08-27T02:33:10+5:302016-08-27T02:33:10+5:30
ट्रकमध्ये दारू असल्याची बतावणी करीत कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या

लाचखोर पोलिसांना अटक
भिवापुरात ‘एसीबी’ची कारवाई ’: दीड लाख रुपयांची मागितली लाच
भिवापूर : ट्रकमध्ये दारू असल्याची बतावणी करीत कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार व शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली. दोघांचीही भिवापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भिवापूर शहरात करण्यात आली.
पोलीस हवालदार राजेश काशीराम माकडे (बकल नंबर ५७२) व पोलीस शिपाई ओम सहारे (बकल नंबर ११२३) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. फिर्यादी हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. ते त्यांच्या वाहनात घरगुती साहित्य घेऊन शुक्रवारी पहाटे चंद्रपूरहून भिवापूरला आले होते. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या हवालदार राजेश माकडे व शिपाई ओम सहारे या दोघांनी त्यांचे वाहन पकडले. या वाहनात दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे, अशी बजावणी करीत त्यांनी सदर वाहन ताब्यात घेतले. परंतु, गुन्हा दाखल केला नाही. या दोघांनीही ही कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीला १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली.
फिर्यादीला ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लगेच नागपूर येथील ‘एसीबी’च्या कार्यालयात तक्रार नोंदविली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यात त्यांना तथ्य आढळून आल्याने भिवापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात सायंकाळी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे फिर्यादीने राजेश माकडे याला १ लाख ५० हजार रुपये दिले. ही रक्कम स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर ओम सहारे यालाही अटक करण्यात आली.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, दिनेश शेंडे, प्रभाकर बेले, राजेंद्र जाधव, अमोल फिस्के, दास यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)