लाचखोर वाढले

By Admin | Updated: January 31, 2016 02:56 IST2016-01-31T02:56:45+5:302016-01-31T02:56:45+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१५ या एका वर्षात एकूण १७३ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली.

The bribe grew | लाचखोर वाढले

लाचखोर वाढले

महसूल, पोलीस खाते आघाडीवर : वर्षभरात १७३ लाच प्रकरणे
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१५ या एका वर्षात एकूण १७३ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत सापळा प्रकरणांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे या वर्षातदेखील सर्वात जास्त लाच प्रकरणांत महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१५ या वर्षभरातील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे, लाच मागण्याचे वाढते प्रमाण यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. २०१५ या वर्षात १७३ सापळा प्रकरणांमध्ये २०६ आरोपी अडकले.
एकूण सापळ्यांत अडकलेल्यांमध्ये महसूल व पोलीस विभागातील प्रत्येकी ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेतील ३१ तर वनविभागातील १५ जणांचा समावेश आहे. वर्षभरात ६६ प्रकरणे निकाली निघाली तर १३ जणांना शिक्षा झाली.(प्रतिनिधी)

‘क्लास वन’चे ११ अधिकारी सापळ्यात
१ जानेवारी ते १७ डिसेंबर २०१५ या कालावधीत एकूण ११ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात पोलीस दलातील २ तर जिल्हा परिषदेतील ४ अधिकारी आहेत. दुसऱ्या श्रेणीतील २० अधिकाऱ्यांना लाच प्रकरणात पकडण्यात आले. सर्वात कमी म्हणजे ७ कर्मचारी हे चतुर्थ श्रेणीतील निघाले.
२ वर्षांत १३६ टक्क्यांची वाढ
२०१४ या वर्षात एकूण १५४ सापळा प्रकरणे झाली होती व यात १९७ आरोपी सापडले होते. २०१५ मध्ये हाच आकडा १७३ प्रकरणे व २०६ आरोपी इतका गेला. एकूण लाच प्रकरणात १२ टक्क्यांची वाढ दिसून आली. २०१३ च्या तुलनेत मात्र हा आकडा १३६ टक्के इतका वाढला आहे. २०१३ मध्ये ६३ प्रकरणांत ८७ आरोपी सापडले होते.

Web Title: The bribe grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.