लाचखोर कर्मचारी अडकला
By Admin | Updated: September 18, 2014 00:45 IST2014-09-18T00:45:43+5:302014-09-18T00:45:43+5:30
निवृत्त कर्मचाऱ्याचे अर्जित रजेचे बिल काढून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. पद्माकर तुकारामजी शेंडे असे आरोपीचे नाव आहे.

लाचखोर कर्मचारी अडकला
एसीबीची कारवाई : सहसंचालक कार्यालयात खळबळ
नागपूर : निवृत्त कर्मचाऱ्याचे अर्जित रजेचे बिल काढून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. पद्माकर तुकारामजी शेंडे असे आरोपीचे नाव आहे.
प्रभाकर बिसनजी निंबार्ते (वय ६८) हे कामठीच्या सेठ पोरवाल महाविद्यालयात ग्रंथालय परिचर म्हणून सेवारत होते. ३१ आॅक्टोबर २००६ ला ते सेवानिवृत्त झाले. सहाव्या वेतन आयोगानुसार, १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २००६ या कालावधीतील त्यांची अर्जित रजेची रक्कम शिक्षण विभागाकडे थकीत होती. ती मिळण्यासाठी त्यांनी सहसंचालक, उच्च शिक्षण नागपूर विभाग यांच्याकडे अर्ज केला होता. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जुलै २०१४ मध्ये ते या कार्यालयात आले. तेथे त्यांना ग्रंथालय परिचर पद्माकर तुकारामजी शेंडे भेटले. एकाच महाविद्यालयात कार्यरत असल्यामुळे निंबार्ते यांनी शेंडेंकडे चौकशी केली असता आपण या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचे शेंडेंनी सांगितले. ‘हे काम माझ्याकडेच असून, तुमचे अर्जित रजेचे २५ हजारांचे बिल वरिष्ठांकडे सादर करायचे असेल तर १० हजार रुपये लाच द्यावी लागेल‘, असे शेंडे म्हणाले. ओळखी असूनही आपल्या हक्काच्या रक्कमेपैकी शेंडे चक्क ४० टक्के रक्कम लाच म्हणून मागत असल्याचे पाहून निंबार्ते यांनी त्याला तडजोड करण्यासाठी विनवणी केली. मात्र, शेंडेंने १० हजार देत असाल तरच बिल वरिष्ठांकडे सादर करतो, असे सांगितले. एवढेच नव्हे तर, त्याच दिवशी ५ हजार रुपये मागितले. लाचेसाठी चटावलेल्या शेंडेंला धडा शिकवण्यासाठी निंबार्ते यांनी त्याची मागणी मान्य करून सरळ एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. त्यांनी तक्रार नोंदवताच पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने सापळा रचला ठरल्याप्रमाणे आज दुपारी २ वाजता निंबार्ते लाचेची रक्कम घेऊन शेंडेंकडे गेले. लाच स्वीकारताच कार्यालय परिसरात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने शेंडेंच्या मुसक्या बांधल्या.(प्रतिनिधी)
कार्यालयात खळबळ
कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्याचे लक्षात आल्यामुळे सहसंचालक कार्यालयात एकच खळबळ उडाली. काहींनी बाहेर धाव घेत जमलेल्या गर्दीतील अनेकांना ‘नंतर या‘ असा निरोप दिला. अधीक्षक प्रकाश जाधव, अतिरिक्त अधीक्षक वसंत शिरभाते, उपअधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कामगिरी बजावली.