सिग्नल तोडणे म्हणजे देशाच्या घटनेचा अपमान
By Admin | Updated: November 27, 2014 00:19 IST2014-11-27T00:19:47+5:302014-11-27T00:19:47+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांतून देशाला घटना तर मिळाली. परंतु या घटना संस्कृतीचा समाजाला विसर पडतो आहे. अगदी रस्त्यावरुन सिग्नल तोडण्याचे काम म्हणजे देशाच्या घटनेचा व कायद्याचा

सिग्नल तोडणे म्हणजे देशाच्या घटनेचा अपमान
विकास सिरपूरकर : नागपूर विद्यापीठात संविधान सप्ताहाला सुरुवात
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांतून देशाला घटना तर मिळाली. परंतु या घटना संस्कृतीचा समाजाला विसर पडतो आहे. अगदी रस्त्यावरुन सिग्नल तोडण्याचे काम म्हणजे देशाच्या घटनेचा व कायद्याचा अपमान करण्यासारखेच आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने बुधवारी सायंकाळी दीक्षांत सभागृहात संविधान दिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे हे उपस्थित होते. शिवाय प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, बीसीयुडी संचालक डॉ. श्रीकांत कोमावार, डॉ. पुरण मेश्राम यांचीदेखील उपस्थिती होती. यावेळी कुलगुरूंनी सर्वांना प्रास्ताविकेची शपथ दिली.
घटनेने नागरिकांना अधिकार दिले आहेत. परंतु त्याची जाण कमी होत चालली आहे. जागोजागी नियम तोडण्याच्या घटनांतून हे प्रकर्षाने समोर येते. नागरिकांनी संविधांनाचा योग्य तो आदर केलाच पाहिजे, असे न्या.सिरपूरकर म्हणाले. डॉ.आंबेडकर यांच्यामुळे देशाला संविधान मिळाले. या संविधानामुळे भारताला नवीन ओळख मिळाली. या संविधानाने जगाला समतेचा विचार दिला. तरुणांनी या संविधानाचे महत्त्व जाणले पाहिजे, असे मत न्या.गवई यांनी व्यक्त केले. यावेळी प्रभारी कुलगुरुंनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल खोब्रागडे यांनी संविधानावरील दोन सुश्राव्य गाणी सादर केली. डॉ. श्रीकांत कोमावार यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.अनिल हिरेखण यांनी संचालन केले. विद्यापीठात प्रथमच संविधान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हे विशेष.(प्रतिनिधी)