फर्निचरच्या दुकानात तोडफोड
By Admin | Updated: June 1, 2017 02:41 IST2017-06-01T02:41:56+5:302017-06-01T02:41:56+5:30
कूलर उधार दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या आरोपींनी फर्निचरच्या दुकानात तोडफोड केली.

फर्निचरच्या दुकानात तोडफोड
कारच्या काचा फोडल्या : आगही लावली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कूलर उधार दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या आरोपींनी फर्निचरच्या दुकानात तोडफोड केली. दुकानमालकाची कार फोडली अन् पेट्रोल टाकून दुकानाला आग लावून दिली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भालदारपुऱ्यात सोमवारी दुपारी ही घटना घडली.
भालदारपुरा येथे अब्दुल मतीन रहमान (वय ४८) यांचे महाराजा फर्निचर नामक दुकान आहे. याच भागात राहणारे आरोपी जावेद शकीउल्ला ऊर्फ काजूखान आणि मोहसीनखान शमीऊल्ला ऊर्फ कल्लू हे सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास दुकानात आले. त्यांनी दुकानातील एक कूलर पसंत केला आणि मतिन यांना तो कूलर उधारीत विकत मागितला. मतिन यांनी उधारीवर कूलर देण्यास नकार देऊन पैसे द्या आणि कूलर घेऊन जा, असे म्हटले. त्यामुळे आरोपी चिडले. त्यावेळी वाद घालून ते निघून गेले. त्यानंतर काही वेळेने ते परत आले. आरोपींनी यावेळी मतिन यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दुकानात तोडफोड केली आणि यावेळी दुकानात आलेल्या जाफर अंसारी याच्या कारचीही तोडफोड केली. या घटनेची तक्रार नोंदविण्यासाठी मतिन पोलीस ठाण्याकडे जात असल्याचे पाहून आरोपींनी एका बाटलीत पेट्रोल आणले आणि ते दुकानभर शिंपडून आग लावली. परिणामी फर्निचर जळाले.
परिसरात तणाव
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. जावेद आणि कल्लूला शोधण्यासाठी काही जण परिसरात फिरू लागले. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी फिर्यादी गटातील व्यक्तींना शांत केले. मतिन यांच्या तक्रारीवरून आरोपी जावेद आणि कल्लूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.