जगातील सर्वात मोठ्या ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’वर ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:33+5:302021-01-08T04:24:33+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारात नागपूरच्या मेडिकलमधून सुरू केलेला जगातील सर्वात मोठा ...

जगातील सर्वात मोठ्या ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’वर ब्रेक
सुमेध वाघमारे
नागपूर : वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारात नागपूरच्या मेडिकलमधून सुरू केलेला जगातील सर्वात मोठा ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) थांबविण्यात आला आहे. रुग्णांचे मृत्यू रोखण्यात प्लाझ्मा थेरपी अपयशी ठरल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
‘कोविड-१९’वर अँटी-व्हायरल उपचार नसल्याने ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उम्मेद जागविली होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने यात पुढाकार घेत ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ प्रकल्पाची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेडिकल) सोपविण्यात आली. २८ जून २०२० रोजी याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पासाठीचा निधी हा मुख्यमंत्री मदत निधीतून उपलब्ध करून देण्यात आला. कोविड विषाणूच्या संसगार्तून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील रक्तद्रव वेगळा करून तो संसर्ग झालेल्या रुग्णांना देण्याची ही चाचणी होती. हा प्रकल्प राज्यातील २१ रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आला होता. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या ४७२ रुग्णांवर चाचणी केली जाणार होती. यामुळे जगातील पहिला व सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला गेला. ‘प्लाझ्मा डोनेशन’, ‘प्लाझ्मा बँक’, ‘प्लाझ्मा ट्रायल’ आणि ‘इमर्जन्सी ऑथरायजेशन’ या चार सुविधांचाही समावेश या प्रकल्पामध्ये करून संकलित माहितीचे विश्लेषण केले जाणार होते. परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये ‘आयसीएमआर’ने प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचे आपल्या अभ्यासाद्वारे स्पष्ट केले. तेव्हापासून ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. नुकतेच मेडिकलनेही चाचणी थांबविण्यात येत असल्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपविला आहे.
-नागपुरात ३३ रुग्णांवर चाचणी
मेडिकलमध्ये जवळपास ३३ रुग्णांवर प्लाझ्माची चाचणी करण्यात आली. यांच्यावरील निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. सूत्रानुसार, प्लाझ्मा थेरपी रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच एखाद्या काेरोना रुग्णाची प्रकृती गंभीर होत असेल तर त्याची प्रकृती बिघडण्यापासून रोखण्यातही प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आले आहे.
-२१ रुग्णालयांवर प्रत्येकी ३२ लाख खर्च
‘प्रोजेक्ट प्लॅटिना’मध्ये सहभागी असलेल्या २१ रुग्णालयांवर शासनाचे प्रत्येकी ३२ लाख रुपये खर्च झाले आहेत. यातून घेतलेल्या यंत्रसामग्रीचा वापर आता ‘ऑफलाईन’ प्लाझ्मा दानावर होणार आहे.