रामदासपेठेत धाडसी घरफोडी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST2020-12-25T04:07:48+5:302020-12-25T04:07:48+5:30
दोन महिन्यात एकाच फ्लॅटमध्ये दुसऱ्यांदा चोरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रामदासपेठ येथील एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५.७५ ...

रामदासपेठेत धाडसी घरफोडी ()
दोन महिन्यात एकाच फ्लॅटमध्ये दुसऱ्यांदा चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामदासपेठ येथील एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५.७५ लाखाचे दागिने चोरून नेले. दोन महिन्यात एकाच फ्लॅटमध्ये दुसऱ्यांदा चोरी झाल्याने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे.
करण दीपक जायस्वाल हे मूळचे चंद्रपूरचे राहणारे आहेत. ते दोन वर्षांपासून रामदासपेठ येथील साई अंकुर अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. त्यांचा दारू व कोळशाचा व्यवसाय आहे. जायस्वाल हे अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावर तर त्यांचे सासू-सासरे हे पाचव्या माळ्यावर राहतात. २० डिसेंबर रोजी जायस्वाल हे परिवारासह चंद्रपूरला गेले होते. यादरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. बेडरुमच्या एका आलमारीत हिरे व सोन्याचे दागिने ठेवले होते. या आलमारीला लॉक नव्हते. आरोपींनी ड्रावर तोडून १५.७५ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. आरोपींनी बेडरुममधील दुसरी आलमारीसुद्धा तोडली. परंतु त्यात किमती वस्तू नव्हत्या. जायस्वाल यांनी त्यांच्या मोलकरणीला मंगळवारी सायंकाळी नागपूरला पोहोचत असल्याचे सांगितले होते. त्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाची चावी शेजाऱ्यांकडे ठेवली होती. मोलकरणीने शेजाऱ्यांकडून चावी घेऊन दरवाजा उघडला, तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी जायस्वाल यांना माहिती दिली. जायस्वाल यांनी बुधवारी दुपारी नागपूरला पोहोचल्यावर तक्रार दाखल केली.
अपार्टमेंट व फ्लॅटच्या मुख्य दरवाजाजवळ सीसीटीव्ही लावलेला आहे. त्याच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत. त्यांना मोलकरणीवर संशय आहे. मोलकरणीची बहीण ही जायस्वाल यांच्या सासू-सासऱ्यांकडे काम करते. जायस्वाल यांच्या फ्लॅटमध्ये ऑक्टोबर महिन्यातही चोरी झाली होती. त्यावेळीसुद्धा १५ लाखाचे दागिने चोरीला गेले होते. त्या प्रकरणाची तक्रारसुद्धा सीताबर्डी पोलिसात दाखल आहे. पोलीस तपासाच्या नावावर केवळ खानापूर्ती करीत असल्याचेच पुन्हा एकदा या घटनेवरून दिसून येते. सीताबर्डीतील हे अपार्टमेंट अतिशय सुरक्षित आहे. सीसीटीव्हीसोबतच येथे नेहमी एक चौकीदार असतो. अशा परिस्थितीतही येथील एका फ्लॅटमध्ये दोनवेळा चोरी होणे हे धक्कादायक आहे.