पाचपावलीत धाडसी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:28+5:302021-06-16T04:10:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावलीतील एका कापड विक्रेत्याकडे धाडसी घरफोडीचा गुन्हा घडला. चोरट्यांनी त्यांच्या घरातून ४० तोळे सोने ...

पाचपावलीत धाडसी घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीतील एका कापड विक्रेत्याकडे धाडसी घरफोडीचा गुन्हा घडला. चोरट्यांनी त्यांच्या घरातून ४० तोळे सोने आणि पावणेदोन लाखांची रोकड चोरून नेली. सोमवारी सायंकाळी या घरफोडीची माहिती कळाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.
मोहम्मद इम्तियाज मोहम्मद बशिर अन्सारी (वय ५०) हे कपड्यांवर एम्ब्रॉयडरी वर्क करतात. ते पाचपावलीतील बाबा बुद्धाजीनगरात राहतात. त्यांच्या मुलाचे साक्षगंध अहमदाबाद (गुजरात) येथे असल्याने ते सहपरिवार तिकडे गेले होते. लग्न तोंडावर असल्याने त्यांनी आपल्या घरात सोने, रोकड जमवून ठेवले होते. चोरट्यांनी ही संधी साधली. दार तोडून त्यांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख एक लाख ७५ हजार असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. १३ ते १४ जूनदरम्यान ही घरफोडीची घटना घडली. ती उघड होताच एकच खळबळ उडाली. इम्तियाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत आठ लाख रुपये (जुन्या भावानुसार) नोंदवली आहे.
---