बसमध्ये धाडसी चोरी
By Admin | Updated: January 5, 2015 00:46 IST2015-01-05T00:46:26+5:302015-01-05T00:46:26+5:30
गिट्टीखदान आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत चोरट्याने धावत्या बसमधून तीन लाखांचे दागिने लंपास केले. तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीच्या

बसमध्ये धाडसी चोरी
तीन लाखांचे दागिने लंपास : चोरट्यांची हातचलाखी
नागपूर : गिट्टीखदान आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत चोरट्याने धावत्या बसमधून तीन लाखांचे दागिने लंपास केले. तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीच्या बॅगमधून ३० हजारांची रोकड अन् मोबाईल काढून घेतला.
दाभा येथील जयश्री विनोद बारई (वय ३९) या ३१ डिसेंबरला दुपारी ४ वाजता बहिणीच्या लग्नासाठी भंडारा येथे जायला निघाल्या. गिट्टीखदान परिसरातून त्या भंडारा ते नागपूर बसमध्ये बसल्या. धावत्या बसमध्ये त्यांच्या सुटकेसमधून चोरट्याने बेमालुमपणे तीन लाखांचे दागिने लंपास केले. रात्री १० वाजता ही घटना उघडकीस आली. जयश्री बारई यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
विनायक उद्धवराव जोशी (वय ५७, रा. गणेशगौरी अपार्टमेंट, कोतवालनगर) हे शनिवारी रात्री फुले मार्केट गणेशपेठमध्ये भाजीपाला घेत होते. श्रीराम किराणा दुकानाजवळ चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील ३० हजारांची रोकड आणि २२ हजारांचा मोबाईल लंपास केला. जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
बसवर दगडफेक चालकाला मारहाण
बसवर दगडफेक करून बसचालकाला मारहाण करणाऱ्या अली खान अहमद खान (वय ४२) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सतीश अशोकराव कदम (वय २५, रा. काटोल रोड,नागपूर) हे आज सकाळी ११ वाजता काटोलहून नागपूरला प्रवासी बस घेऊन येत होते. गिट्टीखदान हद्दीत काटोल रोड, आयबीएम रोड, हनुमान मंदिराजवळ (वाजपेयी आॅटो सर्व्हिसच्या बाजूला) एका दुचाकी चालकाचे संतुलन बिघडल्याने तो बसच्या समोर पडला़ त्यामुळे आरोपी अली खान आणि त्याच्या तीन साथीदारांनी बस पुढे नेण्यास मज्जाव केला. एवढेच नव्हे तर कदम यांना मारहाण करून बसच्या मागच्या काचेवर दगडफेक केली. या प्रकारामुळे प्रवाशात घबराट निर्माण झाली. कदम यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी अली खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.