गंगाजमुनात पोलिसांची धाडसी कारवाई
By Admin | Updated: March 22, 2017 02:43 IST2017-03-22T02:43:42+5:302017-03-22T02:43:42+5:30
पोलिसांकडून वेळोवेळी छुटपुट कारवाई होऊनही गंगाजमुनातील वेश्याव्यवसायावर परिणाम होत नसल्याचे पाहून पोलीस उपायुक्त संभाजी कदम

गंगाजमुनात पोलिसांची धाडसी कारवाई
९१ वारांगना, ४६ ग्राहकांना अटक : कारवाईसाठी स्वत:च शिरले एसीपी, डीसीपी
नागपूर : पोलिसांकडून वेळोवेळी छुटपुट कारवाई होऊनही गंगाजमुनातील वेश्याव्यवसायावर परिणाम होत नसल्याचे पाहून पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी रिना जनबंधू यांनी आज स्वत:च मोठा पोलीस ताफा घेऊन गंगाजमुनात धडक दिली. येथे त्यांनी तब्बल ९१ वारांगना आणि ४६ ग्राहकांना ताब्यात घेतले. या धाडसी कारवाईमुळे ‘रेडलाईट’ परिसरात आज दुपारी प्रचंड खळबळ उडाली.
रेडलाईट एरिया म्हणून कुपरिचित असलेल्या गंगाजमुनात गेल्या अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय चालतो. येथे काही वारांगना स्वमर्जीने वेश्याव्यवसाय करतात तर, काहींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो. वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिला-पुरुष दलालांचे लकडगंज ठाण्यात सलोख्याचे संबंध आहेत. या पापाच्या कमाईचा मोठा हिस्सा पोलिसांना मिळतो. त्यामुळे वेळोवेळी पोलिसांकडून कारवाईचा बनाव केला जातो. अलीकडे दलालांकडून वारांगनांना पुढे करून ग्राहकांना धाक दाखवून लुटण्याचे प्रकार वाढले आहे. बलात्काराचा आरोप लावून मोठी रक्कम, दागिने हिसकावून घेण्याचेही प्रकार वाढले आहे. त्याची माहिती कानावर आल्यापासून पोलीस उपायुक्त (डीसीपी) संभाजी कदम आणि सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) रिना जनबंधू यांनी धडक कारवाईची योजना बनविली. ठरल्याप्रमाणे पोलीस ठाण्यातील मंडळींना वेळेपर्यंत याबाबतची माहिती देण्याचे डीसीपी, एसीपींनी टाळले. त्यानंतर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास एसीपी रिना जनबंधू यांनी पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, लकडगंजचे सहायक निरीक्षक डी. डी. निळे, आर. जी. राजुलवार, महिला सहायक निरीक्षक ए. जी. वानखेडे यांच्यासह ६० पोलिसांचा ताफा घेऊन गंगाजमुनात धडक दिली. तेथून ९१ वारांगना आणि ४६ ग्राहकांना पकडण्यात आले. (प्रतिनिधी)
१० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच
या अनपेक्षित कारवाईमुळे गंगाजमुनात एकच धावपळ निर्माण झाली. अनेक ग्राहक नको त्या अवस्थेत पळत सुटले. काहींनी पोलिसांच्या तावडीतून अशा प्रकारे पळ काढण्यात यश मिळवले. मात्र, ४६ ग्राहक पोलिसांच्या हातात सापडले. या सर्वांवर लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरच्या अलीकडच्या १० वर्षाच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात वारांगना आणि ग्राहकांवर पोलिसांनी केलेली ही पहिलीच धडाकेबाज कारवाई ठरली. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर व्यक्तींनी डीसीपी कदम आणि एसीपी जनबंधू यांचे व्यक्तीश: अभिनंदन केले.