‘ब्रेन डेड’ रुग्णांची नोंदच नाही!
By Admin | Updated: November 5, 2014 00:55 IST2014-11-05T00:55:05+5:302014-11-05T00:55:05+5:30
खासगी आणि शासकीय इस्पितळांनी ब्रेनडेड झालेल्या रुग्णाची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (डीटीसीसी) कळविण्याचे बंधनकारक असताना आतापर्यंत या केंद्राला एकाही ‘ब्रेन डेड’ रुग्णाची

‘ब्रेन डेड’ रुग्णांची नोंदच नाही!
नागपूर : खासगी आणि शासकीय इस्पितळांनी ब्रेनडेड झालेल्या रुग्णाची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (डीटीसीसी) कळविण्याचे बंधनकारक असताना आतापर्यंत या केंद्राला एकाही ‘ब्रेन डेड’ रुग्णाची माहिती देण्यात आली नाही. यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करत असलेले रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेले नातेवाईक अडचणीत आले आहेत.
किडनी, यकृत, फुफ्फुस हे अवयव निकामी झाल्यानंतर कुठलेच उपचार शक्य नाहीत. यासाठी अवयव प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे, परंतु समाजात आणि इस्पितळांमध्येही अवयव प्रत्यारोपणाविषयी उदासीनता असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांच्या स्वाक्षरीने ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट कायदा १९९४ नुसार १३ सप्टेंबर २०१२ रोजी नव्या नियमांचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यात ब्रेनडेड झालेल्या रुग्णाची माहिती डीटीसीसीला देणे बंधनकारक केले आहे. असे न केल्यास तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय नव्या आदेशात इस्पितळातील २५ खाटांचा नियम शिथिल करण्यात आला आहे. आता ज्या इस्पितळामध्ये अवयव प्रत्यारोपण केंद्रे नाहीत. परंतु ज्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया कक्ष आहे त्या ठिकाणी आता नॉन आॅर्गन ट्रान्सप्लांट सेंटर ( एनओटीसी) म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. अशा इस्पितळांनी आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, मात्र आतापर्यंत नागपुरातील एकाही इस्पितळाने तशी नोंदणी केलेली नाही. यामुळे ‘ब्रेनडेड’ रुग्ण असलातरी त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून अवयव काढणे अद्यापही शक्य झालेले नाही. उपराजधानीत अवयवदान चळवळ बाल्यावस्थेतच असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)