दोघांचा जामीन अर्ज फेटाळला
By Admin | Updated: February 13, 2015 02:25 IST2015-02-13T02:25:27+5:302015-02-13T02:25:27+5:30
हुडकेश्वर भागातील राजापेठ बस थांब्यासमोरील बहुचर्चित क्रिकेट बुकी खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने ...

दोघांचा जामीन अर्ज फेटाळला
नागपूर : हुडकेश्वर भागातील राजापेठ बस थांब्यासमोरील बहुचर्चित क्रिकेट बुकी खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळून लावला.
राहुल मधुकर गणवीर (२५) रा. चंदननगर आणि आशिष दिलीप काळे (२७) रा. चैतन्यनगर खरबी, अशी आरोपींची नावे आहेत. शितल श्यामराव राऊत (४०) रा. दुबेनगर, असे मृताचे नाव होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीकांत ऊर्फ चिंगा थोरात(२४) रा. बापूनगर , त्याचे साथीदार राजू ऊर्फ बल्ली शेंडे , राजेश ऊर्फ राजू अण्णा मस्के , रोशन ऊर्फ गोट्या मोहिते , राहुल गणवीर आणि आशिष काळे, अशा एकूण सहा जणांनी १५ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास राजापेठ बसथांब्यानजीकच्या प्रिन्स पानठेल्यासमोर शितल राऊत याला घेराबंदी केली होती. चाकूने भोसकून, कुऱ्हाडीने घाव घालून आणि दगडाने ठेचून त्याचा घटनास्थळीच निर्घृणपणे खून केला होता. शितलचा भाऊ संजय श्यामराव राऊत (४६) याच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी भादंवि ३०२, १४३, १४८, १४९, २०१, १२० (ब) आणि शस्त्र कायद्याच्या ४/२५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. श्रीकांत थोरातसह चार जणांना १६ डिसेंबर तर राहुल गणवीरसह दोन जणांना १७ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
मुख्य आरोपी श्रीकांत थोरात याच्या कबुलीनुसार तो मृताचा पुतण्या कुणाल याच्याकडे एप्रिल २०१४ मध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर उधारीत सट्टा खेळून १० लाख रुपये हरला होता. त्यापैकी ४ लाख रुपयांची त्याने वेळोवेळी परतफेड केली होती. ६ लाख रुपये बाकी होते. शितल हा ‘तुझी किडनी विकून पैसे वसूल करील’, अशी धमकी श्रीकांतला देत होता. परिणामी श्रीकांतने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याचा निर्घृण खून केला होता. आरोपींपैकी राहुल आणि आशिष यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर युक्तिवाद झाला. हे आरोपी जामीन मिळून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर दबाव टाकतील, म्हणून त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील उषा गुजर यांनी केली. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून न्यालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. पी. इंगळे हे आहेत. (प्रतिनिधी)