सुपारी देऊन पतीचा खून पत्नीसह दोघांना जामीन
By Admin | Updated: November 21, 2015 03:31 IST2015-11-21T03:31:48+5:302015-11-21T03:31:48+5:30
प्रियकराच्या मदतीने भाडोत्री गुंडांना दोन लाखांची सुपारी देऊन पतीचा खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी यांच्या एकलपीठाने आरोपी महिलेसह दोघांना जामीन मंजूर केला.

सुपारी देऊन पतीचा खून पत्नीसह दोघांना जामीन
नागपूर : प्रियकराच्या मदतीने भाडोत्री गुंडांना दोन लाखांची सुपारी देऊन पतीचा खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी यांच्या एकलपीठाने आरोपी महिलेसह दोघांना जामीन मंजूर केला.
मनीष किशोर मेश्राम (१९) रा. इंदोरा आणि वंदना रमेश देशभ्रतार (४६) रा. पागलखाना चौक, अशी आरोपींची नावे आहेत. रमेश रावजी देशभ्रतार (५७), असे मृताचे नाव होते. ते एनएडीटी येथे चपराशी होते आणि जरीपटका भागातील बाबा दीपसिंगनगर येथे राहत होते. खुनाची ही घटना १७ जानेवारी २०१५ रोजी बाबा दीपसिंगनगर येथे घडली होती. वंदना देशभ्रतार हिने लुटमारीतून आपल्या पतीचा खून करण्यात आल्याची तक्रार नोंदवल्यावरून जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२, ३९२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पुढे तपासात वंदना देशभ्रतार हीच या खुनाची सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. वंदना आणि मनीष मेश्राम यांचे अनैतिक संबंध होते. बाबा दीपसिंगनगर येथील घर, कोंढाळी येथील भूखंड आणि ग्रॅच्युएटीच्या रकमेवरून पती-पत्नीमध्ये भांडणे सुरू होती. वंदना ही आपल्या पतीला ही मालमत्ता मागत होती आणि तो नकार देत होता. त्यामुळे वंदना हिने आपला प्रियकर मनीष याच्या मदतीने भाडोत्री गुंडांना २ लाखांची सुपारी देऊन आपल्या पतीचा खून केला, असा आरोप आहे. तीन आरोपींनी रमेश देशभ्रतार यांचे हातपाय जखडून ठेवून मनीष मेश्राम याने स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे तपासात आढळले होते. या दोन्ही आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपींच्यावतीने अॅड. लुबेश मेश्राम यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)