मॉलमधील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:11 IST2021-08-18T04:11:43+5:302021-08-18T04:11:43+5:30
मनपा आयुक्तांचे सुधारित आदेश : डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील ...

मॉलमधील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक
मनपा आयुक्तांचे सुधारित आदेश : डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील शॉपिंग मॉल रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. परंतु मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. शॉपिंग मॉलबाबतचे सुधारित आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी काढले आहेत.
तसेच मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेण्याला दोन आठवड्याचा कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, फोटो, ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवावे लागेल, तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवकांना मॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड वा शाळा, महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवावे लागेल. सर्व शॉपिंग मॉलला या नियमाचे कठोरतेने पालन करावे लागेल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
....
एनडीएसने केली जनजागृती
आयुक्तांनी आदेश जारी करण्यासोबतच मनपाच्या उपद्रव शोध पथकातील (एनडीएस) जवानांनी शहरातील शॉपिंग मॉलमध्ये जाऊन कोविड लसीकरण व आवश्यक कागदपत्रांबाबत जनजागृती केली. मंगळवारी व्ही. आर. मॉल, एम्प्रेस मॉल, बिग बजार बर्डी, पूनम प्लाझा, सेंट्रल मॉल, जिंजर मॉल, फॉर्च्युन मॉल व विशाल मेगा मार्ट आदी ठिकाणी पथकांनी लसीकरण व संबंधित कागदपत्रांबाबत जनजागृती केल्याची माहिती पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिली.