शेखूसह दोघांना अटक
By Admin | Updated: January 17, 2017 01:48 IST2017-01-17T01:48:18+5:302017-01-17T01:48:18+5:30
धरमपेठ येथील मोठी लाहोरी बारसमोर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार उत्थाननगर राठोड ले-आऊट येथील रहिवासी गुलनवाजखान ऊर्फ शेखू एजाजखान याच्यासह दोघांना अटक केली.

शेखूसह दोघांना अटक
दहा दिवसांची पोलीस कोठडी : लाहोरी बार गोळीबार प्रकरण
नागपूर : धरमपेठ येथील मोठी लाहोरी बारसमोर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार उत्थाननगर राठोड ले-आऊट येथील रहिवासी गुलनवाजखान ऊर्फ शेखू एजाजखान याच्यासह दोघांना अटक केली. त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ओ. जैन यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा दहा दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला.
रविशसिंग असे शेखूच्या साथीदाराचे नाव आहे. शेखू आणि साथीदारांनी १३ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास लाहोरी बारसमोर गोळीबार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रकरण असे की, बेसा पॉवरहाऊसजवळील गजानन अपर्टमेंट येथील रहिवासी पवन चौधरी हा आपल्या मित्रांना सोबत घेऊन १३ नोव्हेंबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दारू पिण्यासाठी लाहोरीबारमध्ये गेला होता. पवन आणि त्याचे मित्र दारू पिऊन डान्स करू लागले होते. त्याच वेळी एक तरुण आणि तरुणी दारूच्या नशेत डान्स करीत असताना तरुणीसोबत असलेल्या रोशन नावाच्या तरुणाने पवनचा मित्र हर्षल राऊत याची कॉलर पकडून ,‘तब से मै देख रहा हू तुझे, तू मेरी गर्लफ्रेन्ड के तरफ देख रहा है’ असे म्हणत बार बाऊंसर श्रीकांत वनवे याला बोलावून हर्षल याला बाहेर काढण्यास सांगितले होते. बाऊन्सरने हर्षलची कॉलर पकडून बाहेर काढले होते. पवन आणि त्याच्या मित्रांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करताच सात-आठ जणांनी मारहाण करून त्यांना धक्के देत बारच्या बाहेर काढले होते. त्याचवेळी पवनसोबतचे लोक ‘शेखू खान और माया गँग इनको हम लेके आते है,’ असे म्हणत निघून गेले होते. पवन याने ही घटना मीर मिश्रा याला सांगताच तो आपल्या साथीदारांना कारममध्ये बसवून लक्ष्मीभुवन चौकात आला होता. काही वेळाने हे सर्व जण बारच्या पुढे येताच बारमालकाने या लोकांच्या दिशेने गोळीबार केला होता. त्याच वेळी मीर मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनीही गोळीबार करून बारवर दगडफेक केली होती. गुन्हे शाखा पोलिसांनी शेखू आणि रविश यांना अटक केल्यानंतर उपनिरीक्षक सचिन लुले यांनी त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. शेखू हा ३० डिसेंबर २०१५ रोजी भाजयुमोचा नेता हेमंत दियेवार याच्या खुनातून निर्दोष सुटला आहे.(प्रतिनिधी)