खुनात दोघांना जन्मठेप
By Admin | Updated: October 26, 2016 02:59 IST2016-10-26T02:59:59+5:302016-10-26T02:59:59+5:30
मोबाईलवरील बाचाबाचीतून भिलगाव कामठी येथील एका तरुणाला मोटरसायकलने खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

खुनात दोघांना जन्मठेप
वारेगाव अॅश डॅम्प प्रकरण : मोबाईलवरील बाचाबाचीतून झाली होती घटना
नागपूर : मोबाईलवरील बाचाबाचीतून भिलगाव कामठी येथील एका तरुणाला मोटरसायकलने खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारेगाव अॅश डॅम्प परिसरात नेऊन भोसकून निर्घृण खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादीक उमर यांच्या न्यायालयाने दोन जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
संजय ऊर्फ संजू विनायक भिमटे (२३) आणि अतुल ज्ञानेश्वर भडंग (२१) रा. बिना संगम, अशी आरोपींची नावे आहेत. राजन पांडुरंग खांडेकर (२४) रा. भिलगाव कामठी , असे मृताचे नाव होते.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, २५ आॅगस्ट २०१४ रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एमएफएसचे सुरक्षा पथक खापरखेडा ते वारेगाव सुरादेवी, कवठा पाईप लाईनने पेट्रोलिंग करीत असताना पाईप लाईनच्या बाजूला २५-३० वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. मृताच्या पोटावर आणि डोळ्यावर धारदार शस्त्रांच्या जखमा होत्या.
महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे (एमएसएफ) सहायक सुरक्षा अधिकारी दिलीप रामचंद्र निकाळजे यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी भादंविच्या ३०२, २०१ कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो इस्पितळाकडे रवाना करण्यात आला होता.
पोलीस गुन्ह्याचा तपास करीत असतानाच २७ आॅगस्ट २०१४ रोजी मृताचा भाऊ नामदेव पांडुरंग खांडेकर हा पोलीस ठाण्यात आला असता त्याने छायाचित्रावरून आपल्या भावाचा मृतदेह ओळखला होता. (प्रतिनिधी)
अन् सारेच धागेदोरे गवसले होते
पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता त्यांना या रहस्यमय खुनाचे संपूर्ण धागेदोरेच गवसले होते. मृत राजन खांडेकर याने २४ आॅगस्ट २०१४ रोजी आपला पुतण्या बंटी खांडेकर याचा मोबाईल फोन काही वेळ गेम खेळण्यासाठी घेतला होता. त्याच वेळी आरोपी संजय भिमटे आणि अतुल भडंग यांच्यापैकी संजयचा फोन मृताजवळील फोनवर आला होता. फोनवर संजय आणि राजनमध्ये जबरदस्त बाचाबाची झाली होती. त्याच वेळी आरोपी संजय आणि अतुल यांनी राजनचे घर गाठून ‘तू मोबाईलवर शिवीगाळ का केली’, अशी विचारणा केली होती. काही वेळाने आरोपीने मृताला माफी मागून समझोताही केला होता.
दारू पाजून केला घात
मृताबद्दल मनात राग धरून आणि बदल्याची भावना असल्याने आरोपींनी पुन्हा मृताला बोलावून त्याला मोटरसायकलवर बसवून भिलगाव नाका क्रमांक २ येथे नेले होते. श्री वाईन्स येथून दारूची बाटली विकत घेऊन कॅसिनो बीअरबारसमोर तिघांनी दारू प्याली होती. त्यानंतर या दोघांनी राजनला मोटरसायकलवर ट्रिप्पल सिट बसवून वारेगाव अॅश डॅम्प परिसरात नेले होते. त्याच्यावर चाकूने वार करून खून केल्यानंतर मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कवठा ते सुरादेवी पाईप लाईन रोवरील झुडपात फेकून दिला होता.
पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली होती. पोलीस निरीक्षक भीमराव टेळे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. खुनाचे हे संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होते. सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने पुराव्यांची साखळी जुळवून ही साखळी सिद्ध केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, २०१ कलमांतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपींना दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे यांनी काम पाहिले. सहायक फौजदार अरुण भुरे, लक्ष्मण महल्ले आणि हेड कॉन्स्टेबल अशोक शुक्ला यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.