पुस्तके भिजली, पण जिद्द कायम
By Admin | Updated: June 18, 2014 01:29 IST2014-06-18T01:29:42+5:302014-06-18T01:29:42+5:30
गेल्यावर्षी मुसळधार पाऊस झाला. शहरातील जवळपास सर्वच वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले होते. अवस्थीनगरात राहणारे आॅटो चालक मजीद खान यांच्याही घरात पाणी शिरले. त्यांची मुलगी नुकतीच दहावीला गेली होती.

पुस्तके भिजली, पण जिद्द कायम
आॅटोचालक वडिलांना दिली ‘मसरत’
आनंद डेकाटे - नागपूर
गेल्यावर्षी मुसळधार पाऊस झाला. शहरातील जवळपास सर्वच वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले होते. अवस्थीनगरात राहणारे आॅटो चालक मजीद खान यांच्याही घरात पाणी शिरले. त्यांची मुलगी नुकतीच दहावीला गेली होती. पाण्यात तिची संपूर्ण पुस्तके भिजून गेली. आधीच घरची परिस्थिती बेताची. अशा अवस्थेत जुळवाजुळव करून आणलेली पुस्तकेही भिजली. ते पाहून त्या मुलीचे डोळेही पाणावले. परंतु ती खचली नाही. पाऊस ओसरला. भिजलेली पुस्तके उन्हात वाळवली. जोमाने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ९१.२० टक्के गुण घेऊन शाळेत पहिला नंबर पटकावला.
मसरत मजीद खान असे या गुणवंत मुलीचे नाव आहे. मसरतचा अर्थ होतो खुशी़ आज तिच्या या घवघवीत यशाने मजीद खान यांना खरच मोठी खुशी मिळाली आहे़
मसरत ही सदर मंगळवारी बाजार येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी आहे. मसरतचे वडील मजीद हे आॅटो चालक आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. पोलीस लाईन टाकळी परिसरातील अवस्थीनगर येथे ते आपल्या कुटुंबासह एका भाड्याच्या खोलीत राहतात. आॅटोसुद्धा ते भाड्यानेच चालवितात. घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे. परंतु त्यांनी आपल्या तिन्ही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. यातच मसरतने ९० टक्के गुण घेऊन वडिलांचाही मान वाढविला आहे. मसरतला विज्ञान शाखेत जायचे आहे. १२ वी नंतर एमबीबीएस होण्याचे तिचे स्वप्न आहे. तसे तिने वडिलांनाही सांगितले आहे. मसरतच्या या यशामुळे अवस्थीनगरात आनंद पसरला आहे.