Bone marrow Transplant to Medical in Nagpur soon! | उपराजधानीतील मेडिकलमध्ये लवकरच बोनमॅरो ट्रान्सप्लांट!
उपराजधानीतील मेडिकलमध्ये लवकरच बोनमॅरो ट्रान्सप्लांट!

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बहुप्रतीक्षित ‘कॅन्सर हॉस्पिटल’च्या बांधकामासाठी ७६ कोटींची मंजुरी मिळताच ‘हॉस्पिटल’ला अद्ययावत करण्याच्या कार्याला वेग आला आहे. विशेष म्हणजे, या इस्पितळाला ‘जीएमसी कॅन्सर सेंटर’ हे नाव देऊन विविध प्रकारच्या कर्करोगावर येथे अद्ययावत उपचाराची सोय उपलब्ध करून देण्याचा मेडिकलचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून या ‘सेंटर’मध्ये ‘रेडिएशन थेरपी’सह ‘सर्जिकल’, ‘पेडियाट्रिक’ व ‘मेडिसीन ऑन्कोलॉजी’ विभागासोबतच रक्ताच्या कर्करोगावर प्रभावी उपचार असलेला अस्थिमज्जा रोपण(बोनमॅरो ट्रान्सप्लांट) विभाग सुरू करण्यात येणार आहे.
संसर्गजन्य आजाराच्या तुलनेत कर्करोगाने दगावणाऱ्यांची संख्या कैकपटीने अधिक आहे. अलिकडे विदर्भातही कर्करोगाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. याची दखल घेऊन राज्याने नागपूर मेडिकलमधील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करून ‘कॅन्सर हॉस्पिटल’ला मंजुरी दिली. इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे. पूर्वी हे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास करणार होते. आता त्याऐवजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. बांधकामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीनंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

टीबी क्वॉर्टर परिसरात ‘कॅन्सर सेंटर’
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सांगितले, मेडिकलमध्ये होऊ घातलेल्या ‘कॅन्सर हॉस्पिटल’ला ‘जीएमएसी कॅन्सर सेंटर’ असे नाव देण्यात आले आहे. या सेंटरमध्ये सर्वच प्रकारच्या कर्करोगावर उपचाराची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. विशेषत: ‘रेडिएशन थेरपी’सह मेडिसीन ऑन्कोलॉजी, ‘सर्जरी ऑन्कोलॉजी’, पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी’ विभाग असणार आहे.

‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’वरही उपचार
‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून नागपुरात इतर कर्करोगाच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये या रुग्णांची संख्या वाढत आहे. याची दखल घेत डॉ. मित्रा यांनी ‘सर्जरी ऑन्कोलॉजी’ विभागांतर्गत ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’वरही उपचाराचा समावेश केला आहे.

‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’साठी स्वतंत्र विभाग
प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होणाºया ‘अ‍ॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया’सह (एएलएल), ल्युकेमियासह (रक्ताचा कर्करोग), थॅलेसेमिया, सिकलसेल या आजारांवर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ हा प्रभावी उपचार आहे. ‘जीएमसी कॅन्सर सेंटर’मध्ये ही उपचार प्रणाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही डॉ. मित्रा यांनी सांगितले.

दीड लाख स्केअर फूटमध्ये ‘जीएमएसी केअर सेंटर’चे बांधकाम प्रस्तावित आहे. आठ मजली इमारत असणाऱ्या या ‘सेंटर’मध्ये विविध प्रकारच्या कर्करोगावर अद्ययावत उपचारासोबत अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. राज्याने या सेंटरसाठी निधीला मंजुरी दिली आहे. हे सेंटर कर्करोगाच्या रुग्णांसाठी आशेचे केंद्र ठरेल.
-डॉ. सजल मित्रा,
अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: Bone marrow Transplant to Medical in Nagpur soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.