संगीत, नृत्य आणि खेळांनी रंगला सखींचा ‘गेम्स बॉण्ड’

By Admin | Updated: July 17, 2014 01:06 IST2014-07-17T01:06:08+5:302014-07-17T01:06:08+5:30

कुटुंबाच्या जबाबदारी सांभाळताना स्वत:च्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष होते. अशा सखींना जेव्हा व्यासपीठ मिळते, तेव्हा त्या काय धम्माल करतात. याची प्रचिती लोकमत सखी मंच व बॉटनिकल गार्डनद्वारे

'Bond of Games' by the music, dance and games played | संगीत, नृत्य आणि खेळांनी रंगला सखींचा ‘गेम्स बॉण्ड’

संगीत, नृत्य आणि खेळांनी रंगला सखींचा ‘गेम्स बॉण्ड’

लोकमत सखी मंचचा उपक्रम : बक्षिसांची लयलूट
नागपूर : कुटुंबाच्या जबाबदारी सांभाळताना स्वत:च्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष होते. अशा सखींना जेव्हा व्यासपीठ मिळते, तेव्हा त्या काय धम्माल करतात. याची प्रचिती लोकमत सखी मंच व बॉटनिकल गार्डनद्वारे खास सखींसाठी आयोजित केलेल्या ‘गेम्स बॉण्ड’ या स्पर्धेतून आली. हजारीपहाड येथील स्वामी विवेकानंद सभागृहात ही स्पर्धा रंगली. मोठ्या उत्साहाने महिलांनी स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे जिंकली.
या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी महिला सहज खेळू शकतील अशा स्पर्धा घेण्यात आल्या. पाककला स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून लज्जतदार व्यंजने तयार केली होती. व्यंजनांना आकर्षक बनविण्यासाठी सजावटही केली होती. त्याचबरोबर सखींसाठी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. यातून अनेक सखींनी आपली कल्पकता, कलाकुसरीचा नजराणा सादर केला. ‘वन मिनिट शो’मध्ये आपल्या चेहऱ्याला जास्तीतजास्त टिकल्या लावणे, स्ट्रॉद्वारे थर्माकोलचे बॉल गोळा करणे, सेप्टीपिनद्वारे इअररिंग तयार करणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत सखींचा भरभरून उत्साह दिसून आला. त्यानंतर पुरुष वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी झालेल्या महिलांनी पंडित नेहरू, शेतकरी, कीर्तनकार, राज क पूर, चार्ली चॅप्लिन, दबंग आदी वेशभूषा केल्या होत्या. आपल्या वेशभूषेला साजेसे निवेदन त्यांनी मंचावर केले. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. सुरभी साहू आणि पुष्पा यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून स्पर्धेत उत्साह भरला. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण बिजल मलानी आणि कश्मिरा रावल यांनी केले.
स्पर्धेला पापा यादव यांचे विशेष सहकार्य लाभले. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण ममता यादव, माहेश्वरी यादव, नीलेश नाशिककर, बिजल मलानी आणि कश्मिरा रावल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले. विभाग प्रतिनिधी माधुरी इंगळे यांनी स्पर्धेत मोलाचे सहकार्य केले. (प्रतिनिधी)
विविध स्पर्धेतील विजेते
पाककला स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पाककलेचा पुरस्कार लीना पाटील यांनी पटकाविला. द्वितीय पुरस्कार अनघा मुळे तर तृतीय पुरस्काराच्या मानकरी निर्मला नागमोते ठरल्या. मेहंदी स्पर्धेत प्रथम पुरस्कार श्वेता भास्कर व द्वितीय पुरस्कार नेहा टेंभूर्णे यांनी पटकाविला. वेशभूषा स्पर्धेचा प्रथम पुरस्कार ज्योत्स्ना नगरारे, द्वितीय वर्षा बनकर तर तृतीय पुरस्कार निर्मला निघोट यांनी पटकाविला.

Web Title: 'Bond of Games' by the music, dance and games played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.