बोगस बियाणे विक्रे त्यांविरुद्ध मोहीम
By Admin | Updated: June 17, 2014 00:56 IST2014-06-17T00:56:51+5:302014-06-17T00:56:51+5:30
कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा भरारी पथकाने बोगस बियाणे विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील १,००५ दुकानांची तपासणी करून, १७५ दुकानांविरुद्ध विक्रीबंदी आदेश

बोगस बियाणे विक्रे त्यांविरुद्ध मोहीम
पवन अॅग्रोचा परवाना रद्द : १७५ विरुद्ध विक्रीबंदी आदेश
नागपूर : कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा भरारी पथकाने बोगस बियाणे विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील १,००५ दुकानांची तपासणी करून, १७५ दुकानांविरुद्ध विक्रीबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. शिवाय हिंगणा येथील मे. पवन अॅग्रो ट्रेडर्सचा परवाना रद्द करून, नागपुरातील वानखेडे अॅग्रो ट्रेडर्स व बेला येथील गणेश अॅग्रो ट्रेडर्सविरुद्ध परवाना निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या या मोहिमेने बोगस बियाणे विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कृषी विभागाने अशा विक्रेत्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी विभागीय स्तरापासून तर जिल्हा व तालुका पातळीवर ७० स्पेशल स्क्वॉड सज्ज केले आहेत. यामध्ये सुमारे ४०७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विभागीय स्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील व विभागीय गुणनियंत्रण अधिकारी डी. एस. तसरे यांच्या नेतृत्वात गत ९ जून रोजी हिंगणा येथील मे. पवन अॅग्रो ट्रेडर्सवर धाड घालून लाखो रुपयांचा बोगस बियाण्यांचा साठा जप्त केला होता. चौकशी दरम्यान पवन अॅग्रो ट्रेडर्सच्या गोडावूनमध्ये कवच बीजी-२ (महेश ९०४) नावाचे ३३५ पाकीट, लॉटरी बीजी-२ (महाबलवान) नावाचे २९२ व यशोदा २५५ बीजी-२ (कीर्तीमान महासम्राट ८१५२) नावाचे २१० पाकिटांचा साठा आढळून आला होता. त्यावर कृषी अधिकाऱ्यांनी लगेच पवन अॅग्रो ट्रेडर्सविरुद्ध विक्रीबंदी आदेश जारी करून, १३ जूनपर्यंत आवश्यक दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय याच दिवशी कृषी विकास अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीसाठी पवन अॅग्रो ट्रेडर्सचे मालक रमेश दौलत मते यांच्यासह मे. नोव्हेल हायब्रीड सीड्स, मे. कीर्तीमान अॅग्रो जेनेटिक्स लिमिटेड व हिंगणघाट येथील मे. यशोदा हायब्र्रीड सीड्स प्रा. लिमिटेड यांनाही बोलाविण्यात आले होते. मात्र माहिती सूत्रानुसार पवन अॅग्रो ट्रेडर्स व्यतिरिक्त कुणीही सुनावणीला हजर झाले नाही.
सुनावणी दरम्यान कृषी विकास अधिकारी मोहरील यांनी पवन अॅग्रो ट्रेडर्सचे रमेश मते यांना त्यांच्या दुकानात आढळून आलेल्या बोगस बियाण्याविषयी पुरावे मागितले असता, ते सादर करू शकले नाही. त्यामुळे मोहरील यांनी लगेच मे. पवन अॅग्रो ट्रेडर्सचा बियाणे विक्री परवाना क्र. एलएएसडी २७०४००१० हा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. (प्रतिनिधी)