विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा

By Admin | Updated: January 28, 2016 03:13 IST2016-01-28T03:13:10+5:302016-01-28T03:13:10+5:30

मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसात एकच खळबळ उडाली.

Bomb rumor in Vidarbha Express | विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा

विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा

प्रवासी घाबरले : नागपूरसह चार ठिकाणी तपासणी
नागपूर : मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसात एकच खळबळ उडाली. दरम्यान नागपुरात ही गाडी आल्यानंतर या गाडीची कसून तपासणी करण्यात आली. गाडीत काहीच आढळले नसल्याने प्रवाशांसह सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुंबईवरून गोंदियाला जाणाऱ्या रेल्वेगाडी क्रमांक १२१०५ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन मुंबईच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला आला. दरम्यान ही गाडी नाशिकला पोहोचल्यानंतर नाशिकला या गाडीची तपासणी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सायंकाळी घातपात घडविण्याची योजना असू शकते, अशी शंका आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. नाशिकनंतर भुसावळ रेल्वेस्थानकावर पुन्हा या गाडीची तपासणी करण्यात आली, परंतु काहीच आढळले नाही. त्यानंतर पुन्हा अकोला रेल्वेस्थानकावरही तपासणी करण्यात आली. वारंवार तपासणी होत असल्यामुळे गाडीतील प्रवासी चांगलेच घाबरले होते. नागपुरात ही गाडी तब्बल एक तास उशिरा म्हणजे सकाळी १०.०५ वाजता पोहोचली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर या गाडीची रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांच्या श्वानपथकाच्या साह्याने आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या साहाय्याने कसून तपासणी करण्यात आली. परंतु नागपुरातही या गाडीत कुठलीच आक्षेपार्ह बाब आढळली नाही. त्यानंतर प्रवाशांसह सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सकाळी १०.२८ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Bomb rumor in Vidarbha Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.