कारखान्यात बॉयलरचा स्फोट
By Admin | Updated: May 2, 2015 02:16 IST2015-05-02T02:16:09+5:302015-05-02T02:16:09+5:30
कळमना भागातील चिखली ले-आऊट स्मॉल फॅक्टरी एरियात असलेल्या अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट नावाच्या मिठाई कारखान्यात ...

कारखान्यात बॉयलरचा स्फोट
नागपूर : कळमना भागातील चिखली ले-आऊट स्मॉल फॅक्टरी एरियात असलेल्या अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट नावाच्या मिठाई कारखान्यात शुक्रवारी सायंकाळच्या वेळी बॉयलरचा भीषण स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत कारखान्याचा मालक ठार झाला तर १० कामगार गंभीररीत्या भाजून जखमी झाले. सर्वत्र कामगार दिन साजरा होत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
परिसर हादरला
या स्फोटाने संपूर्ण कळमना परिसर हादरला होता. काहींना तर भूकंपाचा आभास झाला. अन्नपूर्णा फॅक्टरीच्या दिशेने होत असलेली धावपळ पाहून लोकांना हा भूकंपाचा धक्का नाही याची जाणीव झाली. स्फोटामुळे कारखान्यातील साहित्य अस्ताव्यस्त झाले होते. मिठाईच्या भांड्यांमध्ये बॉयलर आणि काचेचे तुकडे जमा झाले होते. हादरा इतका जबरदस्त होता की, शेजारच्या कारखान्यातील खिडक्यांची तावदाने फुटली होती. अन्नपूर्णातील स्फोट झालेले बॉयलर हे सुरक्षा भिंतीला लागून असल्याने स्फोटामुळे ही भिंत शेजारच्या कारखान्याच्या भिंतीवर कोसळली.
बजरंग जेठमल अग्रवाल, असे मृत कारखाना मालकाचे नाव आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्यांमध्ये डिप्टी सिग्नल येथील रहिवासी प्रातिचंद बिसेन (२५), अग्नूराम शाहू (४०), नंदराज शाहू (२४), उमेश देशमुख (२५), सचिन टेंभेकर (२३) आणि मनोहर बिसेन (२५) यांचा समावेश आहे. जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. इस्पितळ सूत्रांच्या माहितीनुसार अग्नूराम , पुतण्या नंदराज यांच्यासह तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी नंदराज याला आॅक्सिजनवर ठेवण्यात आलेले आहे. अन्य कामगारांचे डोके, पोट, पाठ आणि हातांना गंभीर दुखापत झाली.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्याच्या तळमजल्यावरील एका भागात ‘नमकीन’ तर दुसऱ्या भागात मिठाई तयार केली जाते. वरच्या माळ्यावर पॅकिंग केले जाते. घटनेच्या आधी कारखान्यात तीन बॉयलर सुरू होते. कारखान्याच्या उजव्या भागाकडे सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या बॉयलरमध्ये बिघाड झाल्याची सूचना कामगारांनी मालक अग्रवाल यांना दिली होती. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अग्रवाल आणि मेकॅनिक हे बॉयलर दुरुस्तीसाठी आले. मेकॅनिक नट-बोल्ट लावत होता.अग्रवाल हे बॉयलरजवळ उभे राहून काम पाहत होते. त्याच वेळी अचानक या बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर बॉयलरचे तुकडे अग्रवाल यांच्या पोटात आणि शरीराच्या अन्य भागात शिरले. परिसरात काम करणारे अन्य कामगारही या स्फोटात जखमी झाले. स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की, अन्य कारखान्यातील कामगार आणि परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले. काहींनी पोलीस, अॅम्बुलन्स आणि अग्निशामक दलाला सूचना दिली. अवघ्या १५ मिनिटातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मात्र उशिरा घटनास्थळावर आले. काही कामगारांनी जखमी कामगारांना कारखान्याच्या बाहेर काढणे सुरू केले. परिसरातील लोकांनीही चार चाकी वाहनांना रोखले. या वाहनांमधून जखमींना वर्धमाननगरातील धर्मार्थ इस्पितळात नेण्यात आले. (प्रतिनिधी)