काटोल तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:18+5:302021-04-20T04:09:18+5:30
सौरभ ढोरे लोकमत न्यूज नेटवर्क काटोल : काटोल तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्या पलिकडे गेली आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा ...

काटोल तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
सौरभ ढोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : काटोल तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्या पलिकडे गेली आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. अशात तालुक्यात कोविडची लक्षणे असलेले नागरिक बोगस डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार घेत शहरात बिनधास्तपणे वावरत आहेत. ग्रामीण भागातच नाही तर शहरातील काही भागातही हे बोगस डॉक्टर प्राथमिक उपचारांच्या नावे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. या बोगस डॉक्टरांवर अंकुश लावण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहेत.
तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. मात्र, रुग्णसंख्येत रोज वाढत होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर भार आला आहे.
दुसरीकडे एकेकाळी खासगी रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम करणारे काहीजण रुग्णांवर उपचार करत आहेत. हे कथित डॉक्टर कोरोनाची लक्षणे असतानासुद्धा नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्याऐवजी सलाईन, गोळ्या देऊन घरीच राहण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे थोडं बरं वाटलं की, हे रुग्ण शहरात आणि समाजात वावरतात. मात्र, ते बाधित असल्याने त्यांच्या माध्यमातून संक्रमणाचे प्रमाण वाढत आहे. या बोगस डॉक्टरांकडे उपचार घेणारे काही रुग्ण अखेरच्या स्टेजला शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचेही दिसून येत आहे.
महसूल व आरोग्य विभागाकडून कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी शासकीय रुग्णालयात चाचणी करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येते. याबाबत गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. तरीही काही नागरिक घरच्या घरी उपचार करून बरे होण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून असले प्रकार होत असावेत. ही चुकीची बाब आहे. अशा बोगस डॉक्टरांची माहिती तहसील कार्यालयाला सुजाण नागरिकांनी द्यावी, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- श्रीकांत उंबरकर, उपविभागीय अधिकारी, काटोल
--
मुळात कोरोना चाचणीला घाबरण्याची गरजच नाही. उलट चाचणी केल्यानंतर यात कोविडबाधित झालेल्यांना तातडीने योग्य उपचार घेता येतात. योग्य उपचाराअंती अनेक रुग्ण बरे झाले आहेत.
- डॉ. सुधीर वाघमारे
ग्रामीण रुग्णालय, काटोल