शरीराला केवळ ३० टक्केच आहाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST2020-12-25T04:09:05+5:302020-12-25T04:09:05+5:30
नागपूर : माणसाला शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केवळ ३० टक्के आहाराची गरज असते. पण अनेक जण दिवसातून चार ते सहा ...

शरीराला केवळ ३० टक्केच आहाराची गरज
नागपूर : माणसाला शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केवळ ३० टक्के आहाराची गरज असते. पण अनेक जण दिवसातून चार ते सहा वेळा खातात. या अतिरिक्त आहारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, कोलेस्टेरॉलसारख्या रोगांना आमंत्रण मिळत आहे, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.
इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ आयोजित
करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राच्या सहाव्या दिवशी मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. मेश्राम यांची मुलाखत घेतली. ‘डाएट फॉर डिसीज प्रिव्हेंशन अॅण्ड वेट कंट्रोल’ हा विषय होता. ‘आयएएन’चे प्रेसिडेंट इलेक्टडॉ. निर्मल सूर्या यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी चंदीगढचे डॉ. मनीष मोदी आणि जयपूरच्या डॉ. भावना शर्मा होत्या.
मेंदूशी संबंधित आजारांवर उपचार करताना डॉ. मेश्राम यांनी आहारशास्त्राचाही अभ्यास केला आणि त्याचा रुग्णांना लाभ करून दिला आहे. माणसाने शरीराला आवश्यक असेल तितकेच खाल्ले पाहिजे. एका जेवणानंतर दुसरे जेवण भूक लागल्यानंतरच केले पाहिजे. दोन जेवणांमध्ये किमान आठ तासांचे अंतर असले पाहिजे. मधल्या काळात पाण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ खाणे टाळले पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली.
-रात्रीचे जेवण व सकाळच्या नाश्त्यात १२ तासांचे अंतर
रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या पहिल्या न्याहारीपर्यंत किमान १२ ते १४ तासांचे अंतर असले पाहिजे. उपवासाची प्राचीन परंपरा दैनंदिन जीवनात स्वीकारली तर सुदृढ आरोग्य राखता येईल, असेही ते म्हणाले. तरुण पिढी पाश्चात्य आहाराला प्राधान्य देत आहे. त्यांच्यामध्ये मद्यपान, धूम्रपानाचे प्रमाण वाढले. झोपेच्या सवयी, व्यायाम न करणे यामुळे तरुणांमध्ये आहारासंदभार्तील आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले. त्यांनी कीटकनाशक विरहित हिरवा भाजीपाला, फळे, घाणीचे तेल, शुद्ध तूप आदींचा आहारात अधिक प्रमाणात वापर करण्याचा सल्लाही दिला.
‘मोबाईल ब्रेन क्लिनिक’ विषयावर डॉ. बिंदू मेनन (नेल्लोर) यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची तपासणी करणे, लसीकरण करणे, छोट्या-छोट्या आजारांवर उपचार करणे आदी उपक्रम राबविले जातात.