लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारपासून बेपत्ता झालेल्या ताजाबाद सक्करदऱ्यातील फरजाना शेख (वय ४०) नामक महिलेचा मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फरजानाची मानसिक अवस्था चांगली नव्हती. ती गुरुवारी अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी या संबंधाने सक्करदरा पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवली. पोलिसांकडून फरजानाचा शोध घेतला जात असतानाच शुक्रवारी सकाळी विहीरगावच्या नाल्यात एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती हुडकेश्वर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदहे मेडिकलला रवाना केला. दरम्यान, तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी शहरातील ठाण्यात माहिती दिली असता सक्करदऱ्यातील फरजाना बेपत्ता असल्याचे आणि मृतदेहाचे वर्णन तिच्या वर्णनाशी मिळतेजुळते असल्याने तिच्या कुटुंबीयांना बोलावून घेण्यात आले. कुटुंबीयांनी तो मृतदेह फरजानाचाच असल्याचे सांगितले. दरम्यान, फरजाना तेथे गेली कशी, तिला कुणी तिकडे नेले का, तिच्यासोबत काही बरेवाईट तर झाले नाही, अशा शंका घेतल्या जात असून वैद्यकीय अहवालातून या शंका आणि प्रश्नांचे उत्तर स्पष्ट होणार आहे. तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
----