आता ‘एम्स’मध्येही देहदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:30+5:302021-01-13T04:21:30+5:30
नागपूर : कौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध तसेच विविध आधारांच्या कारणासंबंधी संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी देहदान ...

आता ‘एम्स’मध्येही देहदान
नागपूर : कौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध तसेच विविध आधारांच्या कारणासंबंधी संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी देहदान ही काळाची गरज आहे. याचे महत्त्व लोकांना कळू लागल्याने मृत्यूनंतर देहदानाचे प्रमाण वाढू लागले आहे. आता यात ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’नेही (एम्स) पुढाकार घेत देहदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शरीररचनाशास्त्र हा वैद्यकीय शिक्षणाचा पाया आहे आणि यासाठी देहदान गरजेचे आहे, जो प्रत्येक जण सहज करू शकतो. पूर्वी याबाबत उदासीनता होती. परंतु, जनजागृतीमुळे हळूहळू देहदानाची संख्या नागपुरात वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, नागपूर हे देहदानाची जन्मभूमी आहे. मेडिकलमध्ये देहदानाची संख्या वाढली आहे. यामुळे गेल्या चार वर्षांत मेडिकलने इतर वैद्यकीय महाविद्यालयांना २० मृतदेह पुरविले. यात नागपूर ‘एम्स’ला सहा मृतदेह पुरविण्यात आले होते. ‘एम्स’मध्ये आता दरवर्षी एमबीबीएस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुरेसे मृतदेह मिळावे यासाठी एम्स’च्या संचालक व मुख्य कार्य अधिकारी मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या प्रयत्नाने मानवी मृतदेहाचे संरक्षण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या समन्वयाने नुकतचे साई सावली वृद्धाश्रम, मनीषनगर येथील एका वृद्धाचे देहदानही झाले. शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए.एम. तारणेकर यांनी ‘एम्स’मध्ये देहदान करणाऱ्यांनी नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही केले आहे.