पतीची हत्या करून घरातच मृतदेह पुरला

By Admin | Updated: September 21, 2015 02:49 IST2015-09-21T02:49:20+5:302015-09-21T02:49:20+5:30

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या करून स्वत:च्या घरातच मृतदेह पुरल्याची थरारक घटना नंदनवनमध्ये घडली.

The bodies were buried in the house by killing husband | पतीची हत्या करून घरातच मृतदेह पुरला

पतीची हत्या करून घरातच मृतदेह पुरला

अनैतिक संबंधाची भयावह परिणती नंदनवनमध्ये थरार सात दिवसानंतर पाप उघड महिला प्रियकरासह गजाआड
नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या करून स्वत:च्या घरातच मृतदेह पुरल्याची थरारक घटना नंदनवनमध्ये घडली. तब्बल सात दिवसानंतर ही भयावह घटना उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
रमेश बानेवार (वय ३५) असे मृताचे नाव आहे. तो पत्नी रंजना (वय २८), तुषार (वय ८) आणि पायल (वय ११) या मुलांसह नंदनवनमधील आझाद नगरात (बिडगांव) चेरी कंपनीजवळ राहत होता. मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेला रमेश गवंडी काम करायचा. काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आला आणि येथेच स्थिरावला.
त्याच्या घराशेजारीच एका फर्निचर कंपनीचे गोदाम होते. येथे वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी अमोल राठोड (वय ४०) नेहमीच यायचा. रंजनासोबत त्याचे वर्षभरापूर्वी सूत जुळले. त्यानंतर रंजना कामावर जाण्याचे टाळून घरीच राहायची. मुले शाळेत गेल्यानंतर अमोल आणि ती अनैतिक संबंध प्रस्थापित करायचे. एक दिवस अचानक रमेश घरी आला. त्याने रंजना आणि अमोलला नको त्या स्थितीत बघितले. ते पाहून रमेशने रंजनासोबतच अमोलचीही धुलाई केली. त्यानंतर रमेशने आपले दु:ख विसरण्यासाठी स्वत:ला दारूच्या बाटलीत बुडवून घेतले. त्याचे व्यसन वाढतच गेले. संशयापोटी तो अनेकदा कामावरही जात नव्हता. त्यामुळे रंजना आणि अमोलच्या संबंधात अडसर निर्माण झाला. मात्र, हे दोघेही एवढे निर्ढावले की रमेशला दारूच्या नशेत तर्र करून ते कुकर्म करीत होते. रमेशला जाग आल्यास हे दोघे त्याला मारहाणही करायचे. पोळ्याच्या पाडव्याला (रविवारी) असाच प्रकार झाला. जागा झालेल्या रमेशने पुन्हा त्यांना पकडले. त्या तिघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर अमोल बाजूला पळून गेला तर रमेश दारूच्या दुकानात गेला.

दोन दिवसांपासून घरातून दुर्गंध
पतीची हत्या करून घरातच मृतदेह पुरला
नागपूर : बाजूलाच लपून बसलेला आरोपी अमोल पुन्हा घरी परतला. त्याने रंजनासोबत संगनमत करून रमेशची हत्या करण्याचा कट रचला. रात्री रमेश घरी परतल्यानंतर या दोघांनी त्याची गळा आवळून हत्या केली. मध्यरात्रीनंतर घरातच खड्डा खोदला. रमेशचा मृतदेह त्यात पुरला आणि वरून मीठ टाकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपींनी त्या जागेवर सिमेंटने फ्लोरिंग केलेजमिनीवर सिमेंट क्राँक्रिट केल्यामुळे आपले पाप उघड होणार नाही, असा आरोपींचा अंदाज होता.
मात्र, तो खोटा ठरला. दोन दिवसांपासून रमेशच्या घरातून दुर्गंध येऊ लागला. तो वाढतच गेला. त्यामुळे शेजाऱ्यात कुजबुज सुरू झाली. बाजूलाच राहाणारा नितेश नरेंद्र खोब्रागडे (वय २७) रमेशचा मित्र होता. त्याने गेल्या सात दिवसात रंजनाकडे अनेकदा रमेशबाबत विचारणा केली. ती संशयास्पद वर्तन करीत असल्यामुळे आणि रविवारी दुर्गंध तीव्र झाल्यामुळे सकाळपासून नितेशने रंजनाकडे रमेश कुठे गेला, दुर्गंध कशाचा आहे, याबाबत चौकशी केली. तिने विसंगत माहिती दिली. दुपारपासून ती बेपत्ता झाल्यामुळे नितेशने रात्री नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. रमेशच्या घरी कुणीच नव्हते आणि दुर्गंधी तीव्र होती. त्यामुळे रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याच्या घरात खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला. (प्रतिनिधी)

Web Title: The bodies were buried in the house by killing husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.