रेल्वेची ‘अपग्रेड सिस्टीम’ ठरतेय प्रवाशांसाठी वरदान
By Admin | Updated: April 25, 2015 02:16 IST2015-04-25T02:16:11+5:302015-04-25T02:16:11+5:30
वेटिंग असलेले तिकीट प्रवासाच्या तारखेपर्यंत ‘कन्फर्म’ न झाल्यास ते रद्द करण्याची पाळी येते.

रेल्वेची ‘अपग्रेड सिस्टीम’ ठरतेय प्रवाशांसाठी वरदान
दयानंद पाईकराव नागपूर
वेटिंग असलेले तिकीट प्रवासाच्या तारखेपर्यंत ‘कन्फर्म’ न झाल्यास ते रद्द करण्याची पाळी येते. परंतु रेल्वेची ‘अपग्रेड सिस्टीम’ प्रवाशांसाठी फायद्याची ठरत असून, १ ते १० एप्रिल २०१५ या कालावधीत ४,५५० प्रवासी अपग्रेड होऊन त्यांना वरच्या क्लासमध्ये बर्थ मिळून त्यासाठी वेगळी रक्कम मोजण्याची गरज पडली नाही. त्यामुळे अपग्रेड सिस्टीम रेल्वे प्रवाशांसाठी वरदान ठरत आहे.
रेल्वे प्रशासनाच्या ‘अपग्रेड सिस्टीम’मध्ये एखाद्या प्रवाशाने खरेदी केलेले स्लिपर क्लासचे तिकीट वेटिंग असल्यास आणि थर्ड एसीमध्ये बर्थ रिकामा असल्यास त्या प्रवाशाला थर्ड एसीच्या डब्यात बर्थ मिळून त्यासाठी वेगळी रक्कम लागत नाही. एसी थ्री टायरच्या प्रवाशाचे रिझर्व्हेशन वेटिंग असेल आणि एसी टू टायरमध्ये बर्थ रिकामा असेल तर त्या प्रवाशास एसी टू टायरमध्ये बर्थ मिळतो. यात प्रवासी अणि रेल्वे प्रशासन दोघांचाही फायदा आहे. एसी कोचमध्ये बर्थ रिकामा असल्यास रेल्वेचे नुकसान होते. जर स्लिपर क्लास प्रवाशाने वेटिंग असल्यामुळे तिकीट रद्द केले तर हे नुकसान आणखी वाढते. त्यामुळे अपग्रेड सिस्टीममध्ये प्रवाशाचा फायदा होऊन रेल्वेच्या महसुलात वाढ होते. १ ते १० एप्रिल या काळात मध्य रेल्वेत एकूण ४,५५० प्रवासी अपग्रेड झाले. त्यामुळे मध्य रेल्वेला एकूण १५ लाख २५ हजार ८७४ रुपयांचा महसूल मिळाला. यात ७३४ प्रवासी वेटिंगच्या यादीतून आरएसीमध्ये गेले. १३३६ प्रवाशांचे वेटिंग कन्फर्म झाले, तर ३,०३९ प्रवासी आरएसीमधून कन्फर्म झाले. अपग्रेड झालेल्या प्रवाशांना त्याबाबतची माहिती संबंधित गाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर मिळते. त्यामुळे चार्ट तयार होण्यापूर्वी तिकीट रद्द करण्याची घाई करण्याची गरज नाही.
चार्ट तयार झाल्यावर त्यांचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी होऊ शकते. १ एप्रिल रोजी मध्य रेल्वेत १६६ प्रवासी वेटिंगमधून आरएसी, १७० प्रवासी वेटिंगमधून कन्फर्म झाले. ३५५ प्रवासी आरएसीतून कन्फर्म झाले तर ५४२ प्रवासी अपग्रेड झाले. २ एप्रिलला ४३९ प्रवासी वेटिंगमधून आरएसी, १३६ प्रवासी वेटिंगमधून कन्फर्म, १३२ प्रवासी आरएसीतून कन्फर्म, तर ३२३ प्रवासी अपग्रेड झाल्याची नोंद आहे.
त्यामुळे चार्ट तयार होईपर्यंत वाट पाहून प्रवाशांनी या संधीचा लाभ घेण्याची गरज आहे.