पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनास बोर्डाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:11+5:302021-07-18T04:07:11+5:30

मंगेश व्यवहारे नागपूर : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी बोर्डाने दिलेल्या फाॅर्म्युल्यानुसार मूल्यांकन झाले आणि शुक्रवारी निकालही घोषित झाला. त्याच धर्तीवर ...

Board refuses to reassess students | पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनास बोर्डाचा नकार

पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनास बोर्डाचा नकार

मंगेश व्यवहारे

नागपूर : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी बोर्डाने दिलेल्या फाॅर्म्युल्यानुसार मूल्यांकन झाले आणि शुक्रवारी निकालही घोषित झाला. त्याच धर्तीवर बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणार आहे. पण पुन्हा परीक्षेला बसणाऱ्या (श्रेणीसुधार) विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यास बोर्डाने यंदा नकार दिला आहे. गेल्यावर्षी पास होऊनही जास्त गुणांच्या अपेक्षेने या विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. परीक्षा तर झाल्याच नाही आणि बोर्डाने त्यांना गुणदान करण्यास नकार दिला आहे.

बारावीनंतर उच्च शिक्षणाकडे वळणारी मुले कमी गुण मिळाल्याने पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतात. मेडिकल, इंजिनिअरिंगकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा यात जास्त समावेश असतो. हे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देण्यासाठी आपापल्या ज्युनि. कॉलेजमध्ये अर्ज दाखल करतात. घरी बसून बारावीची तयारी करतात. त्यांचा उद्देश असतो की मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी आवश्यक पीसीबी, पीसीएम ग्रुपमध्ये चांगले गुण मिळाले तरच उच्च शिक्षणाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये पात्र ठरू. दरवर्षी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मंडळनिहाय किमान दीड ते दोन हजार असते.

गेल्या वर्षी बारावीत कमी गुण मिळालेल्या व जास्त गुणांच्या अपेक्षेने पुन्हा परीक्षा देण्याच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा बोर्डाच्या निर्णयामुळे निराशा आली आहे. आमचे वर्ष वाया जात आहे. आमचेही मूल्यांकन नियमित विद्यार्थ्यांच्या गुणांच्या आधारे करावे, अशी मागणी त्यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्याकडे केली आहे.

- पुन्हा दोन संधी मिळणार

विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीसंदर्भात विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, राज्य शिक्षण मंडळाने मूल्यांकनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मूल्यांकन होत आहे. पण श्रेणीसुधारसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा दोन संधी मिळणार आहे.

Web Title: Board refuses to reassess students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.