नंदनवनमध्ये महिलेचा निर्घृण खून

By Admin | Updated: July 6, 2014 00:45 IST2014-07-06T00:45:07+5:302014-07-06T00:45:07+5:30

नंदनवन परिसरात एका महिलेचा निर्घृण खून झाला. मारेकऱ्याने तिच्या छातीवर, डोक्यावर धारदार शस्त्राचे घाव घालून तिला फरफटत रस्त्याच्या कडेला फेकले. शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आलेल्या

The bloodless woman's murder in Paradise | नंदनवनमध्ये महिलेचा निर्घृण खून

नंदनवनमध्ये महिलेचा निर्घृण खून

परिसरात थरार : मृत महिला अनोळखी
नागपूर : नंदनवन परिसरात एका महिलेचा निर्घृण खून झाला. मारेकऱ्याने तिच्या छातीवर, डोक्यावर धारदार शस्त्राचे घाव घालून तिला फरफटत रस्त्याच्या कडेला फेकले. शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात थरार निर्माण झाला. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.
नंदनवनमधील चांदमारी माता मंदिराजवळून जाणाऱ्या एका दाम्पत्याला शुक्रवारी रात्री ११.५० ला रस्त्याच्या कडेला एक महिला पडून दिसली. त्याने ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने नंदनवन पोलिसांना कळविले. पोलीस पोहचले तेव्हा घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती. महिलेच्या डोक्यातून, छातीतून रक्त वाहात होते. तिच्या सर्वांगावर जखमा होत्या. बघ्यांपैकी कुणीच महिलेला ओळखत नव्हते. तिच्याजवळ तिची ओळख पटविण्यास मदत करणारा कोणताच दुवा नव्हता. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नंदनवनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, पीएसआय साहेबराव गजभारे, नाईट राऊंडवर असलेले पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्यासह अनेक अधिकारी आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ती कोण, कुठली?
मृत महिला अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असून, तिचा वर्ण सावळा आहे. उंची ५ फूट आणि बांधा मजबूत आहे. तिच्या शरीरावर काळी सलवार आणि पांढरा-जांभळा कुर्ता आहे. तिच्या डोक्यावर, डोळ्यावर शस्त्राने मारल्याच्या तर, छातीत भोसकल्याची जखम आहे. गुडघ्यात आणि कंबरेत फ्रॅक्चर आहे. मारेकऱ्याने तिला वाहनाची धडक दिली असावी, असा अंदाज फ्रॅक्चरमुळे डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्याने तिला १५ ते २० मिटर फरफटत नेले असावे, असे घटनास्थळावरचे चित्र होते. फरफटत नेल्यामुळे तिचे शरीर पुरते सोलून निघाले. कपडेही फाटले होते.
बलात्काराची शक्यता नाकारली
मारेकऱ्याने तिला निर्दयीपणे ठार मारले. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कारही केला असावा, असा पोलिसांचा संशय होता. मात्र, आज तिचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता नाकारल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)
निष्पाप जीवाचाही बळी
महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र असल्यामुळे ती विवाहित असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी आधीच काढला होता. डॉक्टरांनी ती गर्भवती होती, असेही आज स्पष्ट केले. तिच्या उदरात तीन महिन्यांचे बाळ होते. तिच्यासोबतच या निष्पाप जीवाचाही मारेकऱ्याने बळी घेतला. तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. तिचे छायाचित्र पाठवून अशा वर्णनाची महिला बेपत्ता आहे काय, त्याची दिवसभर चौकशी केली. वृत्त लिहिस्तोवर मृत महिलेची ओळख पटविण्यास कुणीही पुढे आले नव्हते.

Web Title: The bloodless woman's murder in Paradise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.