चोरीच्या गंजावरून खून
By Admin | Updated: July 15, 2015 03:40 IST2015-07-15T03:40:13+5:302015-07-15T03:40:13+5:30
चोरीच्या गंजावरून उद्भवलेल्या वादातून यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या साथीदार चोराचा खून केल्याचा आरोप ...

चोरीच्या गंजावरून खून
आरोपीस जामीन नाकारला
नागपूर : चोरीच्या गंजावरून उद्भवलेल्या वादातून यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या साथीदार चोराचा खून केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. शेख सलीम शेख हकीम (३६) रा. कुतुबशहानगर गिट्टीखदान, असे आरोपीचे नाव आहे. शेरखान ऊर्फ शेरू छोटेखान (४५) रा. वैशालीनगर घाट, असे मृताचे नाव आहे. त्याचा १९ डिसेंबर २०१४ रोजी पिवळी नदी स्मॉल फॅक्टरी एरिया भागातील चुना कंपनीसमोर राफ्टरने डोक्यावर मारून खून करण्यात आला होता आणि मृतदेह बेवारस स्थितीत फेकून देण्यात आला होता.
प्रकरण असे की, खुनाच्या घटनेच्या एक महिन्यापूर्वी शेरखान आणि मोहम्मद जावेद ऊर्फ लंगड्या नूर मोहम्मद (२९) रा. टिपू सुलतान चौक यांनी सक्करदरा भागातून अॅल्युमिनियमचा गंज चोरला होता. दोघेही आॅटोरिक्षात बसून गंज विकण्यासाठी जात असताना शेरखान लघुशंकेसाठी थांबला असता संधी साधून लंगड्या हा एकटाच निघून गेला होता. गंज विकून त्याने एकट्यानेच पैसे हडपले होते. १७ डिसेंबर रोजी लंगड्या हा वैशाली घाटाजवळ गवसताच शेरखान याने त्याच्या पोटाला वस्तरा लावून त्याच्याजवळील पैसे हिसकावून घेतले होते. या घटनेचा सूड म्हणून लंगड्याने शेरखानला संपवण्याचे ठरवले होते. यासाठी त्याने मोहम्मद वसीम मोहम्मद रऊफ अन्सारी आणि शेख सलीम यांची मदत घेतली होती. या तिघांनी शेरखानला वैशालीनगर घाट येथे गाठले होते. त्याला आॅटोरिक्षात बसवून गर्द पाजली होती. आरोपींनीही गर्द घेतली होती. घटनास्थळी नेऊन त्याचा खून केला होता. यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा छडा लावून तिन्ही आरोपींना अटक केली होती. त्यापैकी शेख सलीमने जामीन अर्ज दाखल करताच न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर आणि संदीप डोंगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)