शासकीय रुग्णालयातील रक्ताचे दर घटले
By Admin | Updated: May 20, 2015 02:48 IST2015-05-20T02:48:25+5:302015-05-20T02:48:25+5:30
राष्ट्रीय रक्तधोरण राबविताना अडचणीचे जाऊ नये, ती योग्य पद्धतीने राबविणे शक्य व्हावे यासाठी रक्तपुरवठ्याच्या सेवा शुल्कात २०० रुपये कपातीचा निर्णय ...

शासकीय रुग्णालयातील रक्ताचे दर घटले
नागपूर : राष्ट्रीय रक्तधोरण राबविताना अडचणीचे जाऊ नये, ती योग्य पद्धतीने राबविणे शक्य व्हावे यासाठी रक्तपुरवठ्याच्या सेवा शुल्कात २०० रुपये कपातीचा निर्णय शासनाने घेऊन रुग्णांना दिलासा दिला आहे. १०५० रुपयांना मिळणारी रक्ताची पिशवी आता शासकीय रुग्णालये व धर्मादाय संस्था संचालित खाजगी रक्तपेढ्यांमध्ये ८५० रुपयांना मिळणार आहे.
वैद्यकीय उपचारांदरम्यान अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकांची उपलब्धता फार महत्त्वाची असते. मात्र, दरम्यानच्या काळात रक्त पिशव्यांचे दर वाढविण्यात आल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला होता. अशातच राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्त व रक्तघटकांसाठी आकारावयाचे सेवा शुल्क व प्रक्रिया चाचणी शुल्काबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना रुग्ण हिताच्या असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील शासकीय रक्तपेढ्या, धर्मादाय संस्था संचालित खाजगी रक्तपेढ्यांमार्फत रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठीचेआकारावयाचे सेवाशुल्क निश्चित करण्यात आले होते. आरोग्यमंत्र्यांनी २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय एड्स नियंत्रण विभागाकडून अर्थसाहाय्य शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्त व रक्तघटकांसाठी आकारण्याात येणाऱ्या सेवा शुल्कात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांच्या पत्रानुसार केवळ शासकीय रक्तपेढ्यांमध्ये आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्कात सुधारणा करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)