दारू विक्रेत्यांची नाकाबंदी
By Admin | Updated: June 29, 2015 03:01 IST2015-06-29T03:01:57+5:302015-06-29T03:01:57+5:30
लकडगंज पोलिसांनी गंगाबाई घाट स्वीपर कॉलनीतून मोठ्या प्रमाणावर विषारी गावठी दारू जप्त केली. दुसरीकडे मुंबई विषारी दारूकांडापासून धडा घेत ...

दारू विक्रेत्यांची नाकाबंदी
लकडगंजमध्ये विषारी दारू जप्त : गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : लकडगंज पोलिसांनी गंगाबाई घाट स्वीपर कॉलनीतून मोठ्या प्रमाणावर विषारी गावठी दारू जप्त केली. दुसरीकडे मुंबई विषारी दारूकांडापासून धडा घेत गुन्हे शाखेच्या पथकाने उपराजधानीतील विविध भागात धाडी घालून मोठा गावठी दारूचा साठा जप्त केला. दोन दिवसांत २७ गावठी दारू विक्रेत्यांनाही अटक करण्यात आली.
गंगाबाई घाट स्वीपर कॉलनीत राहणारा आरोपी राजू चंद्रशेखर जोशी (वय २४) हा गावठी दारूत विषारी पदार्थ मिसळून विकत असल्याची माहिती पोलिसांना कळली. पिणाऱ्यांना जास्त आणि प्रदीर्घ झिंग चढावी या हेतूने गावठी दारू विक्रेते दारूत बेशरमचा पाला किंवा विषारी पावडर अथवा द्रव मिळवतात. राजू असेच करीत असल्याचे कळाल्याने लकडगंज पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्याच्याकडे धाड घातली.
यावेळी त्याच्याकडे २५ लिटर हातभट्टीची दारू आढळली. ही दारू सेवन केल्यास त्यापासून विषबाधा होऊन पिणाऱ्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी माहिती असूनही आरोपी विषारी दारू विकत असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २२५० रुपयांची दारू, कूलर आणि अन्य साहित्यांसह ४,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जोशीविरुद्ध लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
अवैध दारू करू शकते घात
राजधानी मुंबईत १०० पेक्षा अधिक लोकांचा बळी घेणारी अवैध आणि भेसळयुक्त दारू उपराजधानीलाही आपल्या जाळ्यात घेऊ शकते. शहरात अवैध दारू व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. पोलीस आणि अबकारी विभागाच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय वाढत आहे. येथूनच वर्धा आणि चंद्रपुरातसुद्धा अवैध दारू पाठविली जात आहे. लोकमतने शहरातील अवैध दारू व्यवसायाची माहिती काढली असता जी वस्तुस्थिती समोर आली ती आश्चर्यचकित करणारी आहे. शहरातील बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये दारू माफियांचे वर्चस्व आहे. भेसळयुक्त दारू केवळ १० रुपये ग्लास विकली जाते. त्यामुळे कुणीही सहजपणे दारूच्या नावावर विष प्राशन करू शकतो. अशापरिस्थितीत मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती कधी होईल, हे सांगता येत नाही. भेसळयुक्त दारू माफियांची पाळेमुळे इतकी मजबूत झाली आहेत की ते पोलिसांची अजिबात चिंता करीत नाहीत. या व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची कमाई होते. त्यामुळे मालामाल करणाऱ्या या व्यवसायाला मदत करणे पोलीस आणि अबकारी विभागाही आपले ‘कर्तव्य’ समजू लागले आहे.
गुन्हे शाखेचे धाडसत्र
अशाच प्रकारे गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीतील विविध भागात धाडसत्र राबवून हातभट्टीची शेकडो लिटर दारू जप्त केली. शुक्रवारी नंदनवन, अंबाझरी, सदर, पाचपावली, गिट्टीखदान, अजनी, इमामवाडा, हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी घालून १३ जणांना अटक करण्यात आली. तर, शनिवारी अंबाझरी, सदर, पाचपावली,जरीपटका, गणेशपेठ, कळमना, धंतोली, नंदनवनमध्ये धाडी टाकून १४ दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १७, ३४५ रुपयांची दारू जप्त करण्यात आली.