अंधांनी गुंफली स्वरांची माळ अन् रसिकही घायाळ
By Admin | Updated: May 5, 2015 02:04 IST2015-05-05T02:04:55+5:302015-05-05T02:04:55+5:30
हे जग सुंदर आहे आणि या सुंदर जगात मनाला आल्हादित करणारे एक अदृश्य संगीत सदैव निनादत असते. डोळस माणसांना त्या अदृश्य संगीताचे दर्शन घडेलच याची शाश्वती नसते.

अंधांनी गुंफली स्वरांची माळ अन् रसिकही घायाळ
नागपूर : हे जग सुंदर आहे आणि या सुंदर जगात मनाला आल्हादित करणारे एक अदृश्य संगीत सदैव निनादत असते. डोळस माणसांना त्या अदृश्य संगीताचे दर्शन घडेलच याची शाश्वती नसते. पण दृष्टी गमावून सृष्टीचे दर्शन ज्यांना प्रत्यक्ष घेता येत नाही त्यांना मात्र सृष्टी निनादणाऱ्या या संगीताची जाणीव सदैव होत असते. म्हणूनच असेल कदाचित सोमवारी विष्णुजी की रसोई येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीताच्या कार्यक्रमात अंध कलावंतांनी डोळसांनाही लाजवेल अशी सुरेल स्वरांची माळ गुंफली. या कलावंतांच्या उत्कृष्ट गायकीने उपस्थित रसिकांनी मनमोकळेपणाने दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
मैत्री परिवार संस्था व विष्णुजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने अंध कलावंतांच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील गायक आणि वादक दोघेही दृष्टीबाधित होते. (प्रतिनिधी) स्वरांनी त्यांच्या जगण्याला प्रकाशमान केले. अंध असतानाही नेमकेपणाने स्वर ओळखत विविध वाद्यांवर लीलया फिरणारी त्यांची बोटे आणि स्वरांवरची घट्ट पकड या कलावंतांच्या सादरीकरणाला दाद द्यायला भाग पाडणारी होती. शिबा बेग, जियाउद्दीन, सोनाली मिलमिले, अनिकेत बेंडे, मयंक शाहू, पूजा मिलमिले या अंध कलावंतांनी मराठी आणि हिंदी गीतांना अतिशय नजाकतीने सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात जिया व अनिकेतने गणेशवंदनेने केली.
पुढे एकाहून एक सुरेल गीतांचा कारवाँ सुरू झाला. तेरी दिवानी..., मेरे सपनों की राणी..., बाबुजी धीरे चलना..., अब तुम ही हो..., मै तेनु समझावा की..., सुरिली अखियोंवाली..., या गीतांना कलावंतांनी ताकदीने सादर केले. अनेक गीतांना तर वन्समोरची दाद मिळाली. आता वाजले की बारा..., उगवली शुक्र ाची चांदणी... या लावण्याही जबरदस्त सादर झाल्या. या गायक कलावंतांपैकी काही वादकही होते. आॅर्गन वाजविणारा मयंक च्या गळ्यातील गोडवा, त्याने सादर केलेल्या गीतातून रसिकांनी अनुभवला. किशोर चौधरीने तबल्यावर लावलेला ठेका उपस्थितांना आश्चर्यचकित करून गेला. कार्यक्रमात २१ गीत सादर करण्यात आले.
वाद्यावर सुरेंद्र पथे, किशोर चौधरी, अनिकेत बेंडे, मयंक शाहू यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे संचालन असीधरा लांजेवार हिने केले. (प्रतिनिधी)