गुंडांना नेत्यांचा आशीर्वाद
By Admin | Updated: September 18, 2015 02:47 IST2015-09-18T02:47:45+5:302015-09-18T02:47:45+5:30
उपराजधानातील गुन्हेगार आता नेत्यांच्या अगदी जवळचे झाल्याचे दिसून येत आहे.

गुंडांना नेत्यांचा आशीर्वाद
पोलिसांवर टाकतात दबाव : कारवाई होणार तरी कशी?
नागपूर : उपराजधानातील गुन्हेगार आता नेत्यांच्या अगदी जवळचे झाल्याचे दिसून येत आहे. गुंडांना नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे बुधवारी दुपारी फ्रेण्ड्स कॉलनी येथे एका प्राध्यापकाच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून याप्रकारच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे काम नेतेमंडळी करीत असल्याने पीडित व्यक्ती तक्रार दाखल करायला पुढे येत नाही. एखाद-दुसरे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेच तर त्यांना सुद्धा परत पाठविण्याची व्यवस्था केली जाते.
बुधवारी गँगस्टर सुमित ठाकूर याने फ्रेण्ड्स कॉलनी येथील एका प्राध्यापकाच्या कारला स्वत:च धडक दिली होती आणि प्राध्यापकालाच नुकसान भरपाई मागितली होती. नुकसान भरपाई न दिल्याच्या कारणावरून प्राध्यापकाला मारहाण केली आणि त्यांच्या कारची तोडफोड केली. सुमित हा भाजपा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. हे प्रकरण ठाण्यात पोहोचल्यावर माफिया भाजपा पदाधिकाऱ्याने प्राध्यापकावर दबाव टाकून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते.
याच धर्तीवर कॉटन मार्केटमधील एक गँगस्टर सुद्धा उपराजधानीत दहशत पसरवित आहे. या गँगस्टरचे साथीदार गुन्हे शाखा पोलिसांची प्रतिमा उज्ज्वल बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्नरत आहेत. काही दिवसंपूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी एका चर्चित गुन्हेगाराला पकडले होते. त्याची माहिती देण्यात हा गँगस्टरच सक्रिय होता. हा गँगस्टर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या दोन नेत्यांच्या अगदी खास झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या जनता दरबारातही त्याने हजेरी लावली होती. सीताबर्डीतील भरत खटवानीसह अनेक चर्चित प्रकरणात या गँगस्टरचे नाव आले आहे. परंतु तो नेहमीच सहीसलामत सुटला. ज्याचे महत्त्व काही दिवसांपासून अचानकपणे वाढले आहे, अशा भाजपच्या एका नेत्याचे नाव हा गँगस्टर नेहमी घेतो. याच नेत्याने त्याला एम्प्रेस मॉलमघील पब मालकाकडून खंडणी वसुली करण्याच्या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांपासून वाचवले होते. शहर पोलिसातील काही अधिकाऱ्यांनाही ही गोष्ट माहीत आहे. ते योग्य संधीच्या शोधात आहेत.
एका माजी क्रिकेटपटू तरुणाला धमकावण्याच्या प्रकरणात सहभागी असलेला बुकीसुद्धा नेत्यांशी जुळलेला आहे. खामल्यातील गोलू आणि प्रतापनगरातील तपन नेहमीच भाजप नेत्यांसोबत फिरतांना दिसतात. गुन्हे शाखा पोलिसांनी सट्टेबाजीच्या वसुलीसाठी क्रिकेटपटूला धमकावल्याच्या प्रकरणाचा तपास सुरु करताच नेते सक्रिय झले होते. त्यांनी तरुणाला व त्याच्या कुटुंबीयांना प्रकरण मिटविण्यासाठी बाध्य केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. (प्रतिनिधी)