प्रेरणा सोडून नक्कल करण्यातच धन्यता! ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST2020-12-06T04:08:11+5:302020-12-06T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुणी काही नवे केले की त्यापासून प्रेरणा घेणे महत्त्वाचे. मात्र, नक्कल करणे हीच त्यांची ...

प्रेरणा सोडून नक्कल करण्यातच धन्यता! ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणी काही नवे केले की त्यापासून प्रेरणा घेणे महत्त्वाचे. मात्र, नक्कल करणे हीच त्यांची प्रेरणा असते. शिरिष पै यांच्या हायकू प्रकाराची अशीच नक्कल सर्वत्र दिसून येत असल्याचे विधान ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आज येथे केले.
पुण्याच्या मैत्रेय फाऊंडेशनच्यावतीने प्रख्यात कथा लेखिका शिरिष पै यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा मैत्रेय पुरस्कार प्रख्यात लेखिका आशा बगे यांना एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. यावेळी गिरीश गांधी, मैत्रेय संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मोरेश्वर बडगे, जतीन घिया, नीलेश खांडेकर उपस्थित होते.
शिरिष पै यांनी जपानमधून हायकू हा काव्यप्रकार आणला आणि मराठी हायकू जन्माला घातला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नवे आविष्कार होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. अजूनही शिरिष पै यांचा हायकूचा मराठी फार्म एकमेव असल्याचे एलकुंचवार म्हणाले. काही लोक विशिष्ट लिहित असतात आणि त्याच्या पलिकडे जाण्यात त्यांना रस नसतो. त्यांचा लिखाणाचा धागा घट्ट नसल्याने, पारंपारिक मूल्यांची जाण नसल्यानेच असे होत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक मधुकर भावे यांनी केले तर निवेदन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले.
* सतत साचा मोडणारे एलकुंचवार - आशा बगे
एलकुंचवार हे सतत साचा मोडणारे लेखक असल्याने, त्यांचे साहित्य ताजे वाटते. त्यांच्यातील अतृप्त वृत्तीनेच त्यांनी लेखनाला अनेकविध आयाम दिले. ज्या प्रमाणे स्वरांची साधना गायकांकडून नेती नेती या तत्त्वाने केली जाते. त्याचप्रमाणे जो कलासाधक पुढे जातो, तो मोठा होत असल्याचे आशा बगे यावेळी म्हणाल्या.
...........