विधी विद्यापीठासाठी काळडोंगरीत जमीन
By Admin | Updated: March 16, 2015 02:19 IST2015-03-16T02:19:03+5:302015-03-16T02:19:03+5:30
विदर्भासाठी खूशखबर आहे. बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधी विद्यापीठासाठी जामठ्याजवळच्या काळडोंगरी येथील जमीन ‘फायनल’ करण्यात आली आहे.

विधी विद्यापीठासाठी काळडोंगरीत जमीन
नागपूर : विदर्भासाठी खूशखबर आहे. बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधी विद्यापीठासाठी जामठ्याजवळच्या काळडोंगरी येथील जमीन ‘फायनल’ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित राज्य वकील परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.
१७ एप्रिल २०१३ रोजी राज्यात नागपूर, मुंबई व औरंगाबाद येथे नॅशनल लॉ स्कूलच्या धर्तीवर महाराष्ट्र विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, मुंबई व औरंगाबादच्या तुलनेत नागपुरातील विधी विद्यापीठाचे गाडे पुढे सरकत नव्हते. वारंवार तगादा लावल्यानंतर शासनाने ७० कोटी रुपयांची तरतूद केली. यानंतर जमिनीचा प्रश्न कायम होता. उच्च विभागाचे सहसंचालक डी.बी. पाटील यांनी अनेक ठिकाणी जमिनीचा शोध घेतला होता. शहरात जमीन मिळणे अशक्य असल्याचे समजल्यानंतर शहराबाहेरील जमिनीचा शोध सुरू झाला होता. हा शोध काळडोंगरी येथे संपला आहे. फडणवीस यांच्या माहितीनंतर महाराष्ट्र विधी विद्यापीठ काळडोंगरी येथेच होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नॅशनल लॉ स्कूल स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर नागपूरचे नाव आघाडीवर होते. हायकोर्ट बार असोसिएशन आॅफ नागपूरच्या अमृतमहोत्सवी समारंभात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नागपुरात नॅशनल लॉ स्कूल स्थापन करण्याला पाठिंबा दिला होता.
नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यक्रमात तत्कालीन केंद्रीय विधी व न्यायमंत्री वीरप्पा मोईली यांनीही या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. नागपूरला नॅशनल लॉ स्कूल मिळाले नसले तरी महाराष्ट्र विधी विद्यापीठामुळे शिक्षण क्षेत्रातील मोठी पोकळी भरून निघणार आहे.(प्रतिनिधी)