भाजपाची वाड्यावर तर काँग्रेसची मुंबईत रस्सीखेच
By Admin | Updated: February 3, 2017 02:25 IST2017-02-03T02:25:43+5:302017-02-03T02:25:43+5:30
महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या.

भाजपाची वाड्यावर तर काँग्रेसची मुंबईत रस्सीखेच
दोन्ही पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर नाही : आज वेळेवर ए-बी फॉर्म देणार
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महालातील वाड्यावर भाजपच्या यादीवर अंतिम हात फिरवण्यात आला. मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची यादी निश्चित करण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये वादावादी होऊन रस्सीखेच झाली. शेवटी रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्ष उमेदवार यादी जाहीर करू शकले नाहीत. आज, शुक्रवारी सकाळी दोन्ही पक्षांतर्फे थेट उमेदवारांना ‘ए-बी’ फॉर्म दिले जाणार आहेत.
दुसरीकडे भाजप व काँग्रेसने आपली उमेदवारी यादी जाहीर न केल्यामुळे बंडखोरांवर नजर ठेवून असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाने आपली उमेदवार यादी जाहीर केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या यादीवरही बरेच मंथन झाले. तयार करण्यात आलेल्या यादीत वेळेवर काही बदल करण्यात आले. तिकीट कटल्याची माहिती मिळाल्यामुळे काही नगरसेवक व पदाधिकारी आपली बाजू मांडण्यासाठी रात्री उशिरा समर्थकांसह वाड्यावर पोहचले.
मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठी व विरोधी गटातील नगरसेवकांचे तिकीट कापण्यासाठी घमासान झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यात पूर्व नागपूरच्या जागांवरून वाद झाला. पूर्वच्या जागा अभिजित वंजारी यांच्या एकट्याच्या शिफारशीने का केल्या, आपल्याला विश्वासात का घेतले नाही, असे चतुर्वेदी यांचे म्हणणे होते. मात्र, चव्हाण यांनी चतुर्वेदी हे दक्षिणचे उमेदवार असल्याचे कारण देत पूर्व नागपूरवर चतुर्वेदी यांचा दावा मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे चतुर्वेदी यांनी दक्षिण मधील काही नगरसेवकांचे तिकीट कापण्याचा आग्रह धरला. यावेळी चव्हाण-चतुर्वेदी यांच्यात वाद झाला. प्रभाग ३८ मधील तिकिटासाठी विकास ठाकरे व प्रफुल्ल गुडधे या दोघांमध्येही रस्सीखेच झाली. शेवटी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दोघांनाही ३८ मधून लढू नका, असे सांगत दुसऱ्या प्रभागातून लढण्याची सूचना केली. यावर चतुर्वेदी यांनी गुडधे यांची बाजू घेतली व तसे झाले तर गुडधे अपक्ष लढतील, असा इशारा दिला. बैठकांचे सत्र लांबल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काँग्रेसचे ‘ए-बी’ फॉर्म नागपुरात पोहचू शकले नाहीत. दरम्यान, रात्री उशिरा भाजपच्या काही उमेदवारांना तिकीट पक्के झाल्याचे निरोप देण्यात आले.