काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपाचा सभापती
By Admin | Updated: March 31, 2017 02:53 IST2017-03-31T02:53:56+5:302017-03-31T02:53:56+5:30
महापालिकेच्या आसीनगर झोन सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे सभापती म्हणून निवडून आल्या.

काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपाचा सभापती
आसीनगरात बसपाला रोखले : मंगळवारीत भाजपासाठी बसपाची माघार
नागपूर : महापालिकेच्या आसीनगर झोन सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे सभापती म्हणून निवडून आल्या. दुसरीकडे मंगळवारी झोनमध्ये बसपा उमेदवाराने निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने भाजपाच्या सुषमा चौधरी यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गुरुवारी आयोजित बैठकीत आसीनगर व मंगळवारी झोन सभापतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
आसीनगर झोन सभापती पदासाठी भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे, काँग्रेसच्या भावना लोणारे व बसपाच्या वैशाली नारनवरे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. झोनमधील १६ सदस्यांपैकी बसपाचे ७, काँग्रेसचे ६ तर भाजपचे ३ सदस्य आहेत. संख्याबळाचा विचार करता कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने काँग्रेस व बसपा यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु बसपा व काँग्रेसमधील पडद्यामागील चर्चा फिस्कटल्याने काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बसपाच्या वैशाली नारनवरे यांना सात तर भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे यांना आठ मते मिळाली. काँग्रेसचे संदीप सहारे अनुपस्थित होते. भावना लोणारे यांना एकही मत मिळाले नाही. त्यांनी स्वत:चे मत भाजपाच्या बाजूने दिले.
आसीनगर झोनमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपाचा सभापती झाल्याने मंगळवारी झोनमधून बसपाचे संजय बुर्रेवार यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपाच्या सुषमा चौधरी यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सभागृहात बहुमत नसतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या विरोधात बसपाने निवडणूक लढविली होती. परंतु मंगळवारी झोनमध्ये बसपाची वेगळीच भूमिका दिसून आली.(प्रतिनिधी)
बसपाला रोखण्याचे षड्यंत्र
आसीनगर झोन सभापतींच्या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संगनमताने बसपाला रोखण्यासाठी युती के ल्याचा आरोप बसपाचे जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी केला आहे. आसीनगर झोनमध्ये बसपाचे सर्वाधिक सात नगरसेवक आहेत. आंबेडकरी विचाराला रोखण्यासाठी भाजपा व काँगे्रस एकत्र आले. काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असती तर बसपाचा उमेदवार सहज निवडून आला असता. परंतु काँग्रेस व भाजपा हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जयकर यांनी दिली.
काँग्रेस -बसपा नेत्यांनी प्रयत्नच केले नाही
संख्याबळाचा विचार करता आसीनगर व मंगळवारी झोनमध्ये काँग्रेस व बसपा यांच्यात समझोता झाला असता तर दोन्ही ठिकाणी या पक्षाचे सभापती निवडून आले असते. परंतु दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या संदर्भात पुढाकारच घेतला नाही. या संधीचा फायदा घेत भाजपाने दोन्ही झोनवर आपला कब्जा केला.
काँग्रेस कमिटीला अहवाल देणार
भाजपाला रोखण्यासाठी आसीनगर झोनमध्ये बसपाच्या उमेदवाराला मतदान करावे. किवा तटस्थ राहण्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती. याबाबतच्या सूचना पक्षाच्या नगरसेवकांना देण्यात आल्या होत्या. परंतु मतदान करताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपा उमेदवाराला मतदान केले. याची चौकशी करून याबाबतचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीला सादर करू.
- संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते महापालिका