काँग्रेस नगरसेवकांच्या टेक्याने उपाध्यक्षपदी भाजपचे फलके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:29+5:302020-11-28T04:07:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : दुभंगलेल्या भाजपच्या राजकीय फाटाफुटीच्या जखमेवर मीठ चोळत ऐनवेळी भाजप नगरसेवकाला काँग्रेसने टेकू दिला. जबरदस्त ...

काँग्रेस नगरसेवकांच्या टेक्याने उपाध्यक्षपदी भाजपचे फलके
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : दुभंगलेल्या भाजपच्या राजकीय फाटाफुटीच्या जखमेवर मीठ चोळत ऐनवेळी भाजप नगरसेवकाला काँग्रेसने टेकू दिला. जबरदस्त रस्सीखेच झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक गंगाधर फलके यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांनी भाजपच्याच अरुणा हजारे यांचा १७ विरुद्ध ९ अशा मतांनी पराभव करीत आश्चर्याचा धक्का दिला. या संपूर्ण नाटकीय राजकीय घडामोडीनंतर भाजपात सन्नाटा पसरला असून, काँग्रेसने नगर पालिकेच्या बाहेर पक्षाचा ध्वज उंचावत फटाके फोडले.
गंगाधर फलके यांना १७ तर अरुणा हजारे यांना ९ मते मिळाली. काँग्रेसचे सुरेश चिचमलकर यांना एकही मत मिळाले नाही. उमरेड पालिकेत भाजपची सदस्यसंख्या १९ तर काँग्रेसची संख्या ६ असून नगराध्यक्षपदही भाजपकडेच आहे.
गुरुवारी (दि.२६) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेपूर्वी भाजपच्या वतीने गंगाधर फलके, अरुणा हजारे आणि श्रीकृष्ण फलके या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या वतीने सुरेश चिचमलकर यांनी अर्ज भरला. सरतेशेवटी श्रीकृष्ण जुगनाके यांनी माघार घेतली.
निवडणुकीत हात उंचावून मतदानाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भाजपचे गंगाधर फलके यांनी तब्बल १७ मते घेत बाजी मारली. काँग्रेसच्या ६ नगरसेवकांनी फलके यांना मतदान केले. दुसरीकडे भाजपाच्याच अरुणा हजारे यांना पराभवास सामोरे जावे लागले. हजारे यांना नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी मतदान केले. एकूणच उपाध्यक्षपदाची निवडणूक भाजप विरुद्ध भाजप सोबतीला काँग्रेसचा ‘हात’ आणि ‘साथ’ मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
....
पडद्यामागील हालचाली
नगर पालिकेत भाजपची एकतर्फी सत्ता असताना मागील काही दिवसापासून पडद्यामागे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. गटातटात दुभंगलेल्या भाजपला चांगलाच फटका बसला. पक्ष उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्यास कारवाई करण्यात येईल, असा व्हिप भाजपचे गटनेते डॉ. मुकेश मुद्गल यांनी पक्षाच्या नगरसेवकांना बजावला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर गटनेता मुद्गल कोणती भूमिका बजावतात, याकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.