काँग्रेसच्या दोन सदस्यांना भाजपची ऑफर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:28+5:302021-06-27T04:06:28+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेची पोटनिवडणुक भाजपाने गांभीर्याने घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजपाची सदस्य संख्या कशी वाढेल यासाठी प्लॅनिंग सुरू ...

काँग्रेसच्या दोन सदस्यांना भाजपची ऑफर ()
नागपूर : जिल्हा परिषदेची पोटनिवडणुक भाजपाने गांभीर्याने घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजपाची सदस्य संख्या कशी वाढेल यासाठी प्लॅनिंग सुरू झाले आहे. किमान १० जागा निवडून आणण्याचा दावा भाजपाने केला आहे. त्यासाठी राजकीय डाव खेळत, सदस्यत्व रद्द झालेल्या काँग्रेसच्या दोन सदस्यांना भाजपाने ऑफर दिली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी थेट संपर्क साधत प्राथमिक चर्चाही आटोपली आहे.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता असतानाही काँग्रेसने स्वबळाचा झेंडा हाती घेतला आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने दाखविलेली चमक अजूनही कार्यकर्त्यांच्या डोक्यात आहे. पण २०१९ चा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. दोन टर्म सत्तेत असणाऱ्या भाजपाला यंदा १५ जागेवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसचे संख्याबळ बहुमतांवर गेल्याने भाजपाने सत्तास्थापनेच्या कुठल्याही हालचाली निवडणुकीनंतर केल्या नाहीत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने भाजपासाठी एक संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी भाजपाने सर्वच बाजूने चाचपणी सुरू केली आहे. १६ ही जागेवर भाजप उमेदवारी देणार आहे आणि उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न पक्षाने सुरू केले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेचे तिकीट कापल्याचा फटका भाजपाला जिल्हा परिषदेत बसला होता. सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये काँग्रेसचे ७ तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य आहे. काँग्रेसच्या ५ जागेवर दुसऱ्या क्रमांकावर भाजप राहिली आहे तर राष्ट्रवादीच्या चारही जागेवर भाजपाशी लढत झाली होती. यातील काँग्रेसच्या दोन सदस्यांना भाजपाने आपल्या पक्षाकडून लढण्याची ऑफर दिली आहे. भाजप आपला उमेदवार मागे घेऊन त्यांना उमेदवारी देण्यास तयार असल्याची माहिती भाजपच्या नागपुरातील प्रदेश पदाधिकाऱ्याकडून मिळाली आहे.
- भाजप विद्यमान सदस्यांची घेणार विकेट
भाजपच्या ४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यातील एका सदस्याला डच्चू मिळण्याचेही संकेत आहे. त्याचबरोबर गेल्या निवडणुकीत भाजपाचे जे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यातील काहींना यंदा संधी देण्यात येणार नाही, अशी विश्वसनीय माहिती आहे.