गुढीपाडव्यानंतर भाजपाचे मिशन लोकसभा
By Admin | Updated: March 16, 2017 02:13 IST2017-03-16T02:13:25+5:302017-03-16T02:13:25+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय नोंदवित हॅट्ट्रिक साधली. कधीनव्हे ते तब्बल १०८ जागा निवडून आल्या.

गुढीपाडव्यानंतर भाजपाचे मिशन लोकसभा
बूथ प्रमुखांपासून पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी : प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणार
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय नोंदवित हॅट्ट्रिक साधली. कधीनव्हे ते तब्बल १०८ जागा निवडून आल्या. यामुळे भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, असे असले तरी या विजयाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुस्ती चढू नये याची भाजपाने विशेष काळजी घेतली आहे. गुढीपाडव्यानंतर भाजप लोकसभेची गुढी उभारण्याचे मिशन हाती घेणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ५ लाख ८७ हजार ७६७ मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा २ लाख ८४ हजार ८२८ मतांनी पराभव केला होता. आता महापालिकेतील एकतर्फी यशानंतर लोकसभेतही पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्य मिळविण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत कसे पोहचता येईल, त्याला भाजपाशी कसे जोडता येईल, याची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील बूथची संख्या जवळपास दुप्पट झाली. असे असले तरी भाजपने तत्काळ सर्वच्या सर्व २८०० हून अधिक बूथवर बूथप्रमुख नेमले. यामुळे भाजपचा संघटनात्मक विस्तार होण्यास मदत झाली आहे. आता या बूथ प्रमुखांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात विविध मोहीम, अभियान व कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
सोशल इंजिनिअरिंगवर भर
बौद्ध, तेली, कुणबी, माळी अशा समाजांसोबत संख्येने कमी असलेल्या लहान समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एप्रिलपासून या समाज घटकांच्या प्रमुखांची भाजपा पदाधिकारी भेट घेणार असून, त्यांना पक्षाशी जुळण्याची विनंती करणार आहे. नितीन गडकरी यांनी राबविलेली सामाजिक समरसता या समाजप्रमुखांना पटवून दिली जाणार आहे. याशिवाय केरळ, बिहार येथील नागपुरात वास्तव्यास असलेले लोक, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय लोकांच्या समूहांना भेटी देऊन त्यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित केल्या जाणार आहेत.
आमदारांवर प्रमुख जबाबदारी
आपापल्या विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे समन्वय साधून पक्षाचे कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी आमदारांवर सोपविली जाईल. कोणत्या भागात पक्ष संघटनेच्या माध्यमातून अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, कुठले कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे सोबत कोणत्या भागात महापालिकेच्या माध्यमातून अधिक विकास कामे करणे आवश्यक आहे, याचे नियोजन आमदारांच्या माध्यमातून करण्याचा विचार आहे.
गडकरींच्या वाढदिवशी फोडणार नारळ
२७ मे रोजी नितीन गडकरी यांना वयाची ६० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शहरात एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. या दिवसाचे निमित्त साधत लोकसभेच्या तयारीचे नारळ फोडायचे व कार्यकर्त्यांना कामाला लावायचे, अशी तयारी पक्षात सुरू झाली आहे.
सिमेंट रस्ते अन् मेट्रो रेल्वेचे मार्केटिंग
पुण्यातील मेट्रोचे पिलर अद्याप उभे झालेले नाही. नागपुरात मात्र काम झपाट्याने सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यामुळे नागपूरकरांचे मेट्रो रेल्वेचे स्वप्न साकार होत आहे, असे मार्केटिंग पक्षातर्फे जोरात केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपूरकरांना मेट्रो धावताना दिसेल. वर्षभरात शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झालेले असेल.