निवडणूक नियोजनासाठी भाजपचे ‘गणित’, लोकप्रतिनिधींपेक्षा संघटनेतील अनुभवी त्रिकुटावर विश्वास

By योगेश पांडे | Updated: November 6, 2025 00:03 IST2025-11-06T00:01:19+5:302025-11-06T00:03:07+5:30

भेंडे-गजभिये-पोतदार यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची धुरा, तर प्रवीण दटके प्रभारी

BJP's 'math' for election planning, trust in experienced trio in the organization rather than people's representatives | निवडणूक नियोजनासाठी भाजपचे ‘गणित’, लोकप्रतिनिधींपेक्षा संघटनेतील अनुभवी त्रिकुटावर विश्वास

निवडणूक नियोजनासाठी भाजपचे ‘गणित’, लोकप्रतिनिधींपेक्षा संघटनेतील अनुभवी त्रिकुटावर विश्वास

योगेश पांडे

नागपूर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी भाजपने लोकप्रतिनिधींकडे थेट नियोजनाची जबाबदारी न देता नागपूर जिल्ह्यात संघटनेतील अनुभवी नेत्यांवर विश्वास टाकला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये व डॉ.राजीव पोतदार यांच्याकडे नागपूर जिल्हयातील निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांना संपूर्ण जिल्ह्याचे प्रभारी बनविण्यात आले आहे. या नेत्यांच्या मार्गदर्शनातच नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद व नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकांचे पूर्ण नियोजन होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपची परीक्षा राहणार आहे. विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात मिळालेले यश व शहरात कायम राखलेल्या चार जागा यामुळे आगामी निवडणूकीत त्याहून चांगली कामगिरी करण्याचे पक्षासमोर आव्हान आहे. विधानसभेत भाजपच्या मदतीला लाडक्या बहिणी धावल्या होत्या. मात्र आता अशा योजनेचा थेट आधार पक्षाला मिळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा असल्याने ग्रामीण व शहरी भागातील निवडणूकीच्या आकड्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नागपूर शहर तसेच नागपूर जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारींची घोषणा केली. अनेक वर्षांचा संघटनेचा अनुभव असलेल्या संजय भेंडे, अरविंद गजभिये व डॉ.राजीव पोतदार यांची नावे यासाठी निश्चित करण्यात आली. संजय भेंडे यांना नागपूर शहर निवडणूक प्रमुख करण्यात आले आहे. नागपूर ग्रामीणचे पक्षाने अगोदरच संघटनात्मकरित्या दोन भाग केले आहेत. नागपूर जिल्हयाचे (रामटेक) निवडणूक प्रमुख म्हणून अरविंद गजभिये तर नागपूर जिल्हा (काटोल) येथील निवडणूक प्रमुखपदी डॉ.राजीव पोतदार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर मध्य नागपुरातील आमदार प्रवीण दटके यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचा प्रभार देण्यात आला आहे.

आजी-माजी लोकप्रतिनिधी प्रचारात राहणार

भाजपने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजी-माजी खासदार किंवा आमदारांकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात प्रभारी म्हणून आमदार दटके यांना नियुक्त करण्यात आले आहे. परंतु निवडणूक प्रमुख म्हणून संघटनेतीलच पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. या पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील एकूण राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. शिवाय ते तळागाळातील स्थितीदेखील जाणतात. त्यामुळे ते नियोजनात राहतील तर आजी-माजी लोकप्रतिनिधी प्रचारात सक्रिय राहतील असे यामागील गणित असल्याची माहिती भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

Web Title : नागपुर जिले में चुनाव योजना के लिए भाजपा का संगठन पर विश्वास।

Web Summary : भाजपा ने नागपुर में चुनाव योजना का भार अनुभवी संगठन नेताओं को सौंपा, प्रतिनिधियों को सीधी जिम्मेदारी नहीं दी। संजय भेंडे, अरविंद गजभिये, और डॉ. राजीव पोतदार चुनाव प्रमुख हैं, जिनका पर्यवेक्षण विधायक प्रवीण दटके कर रहे हैं, जो स्थानीय निकाय चुनावों पर ध्यान केंद्रित कर रहे हैं।

Web Title : BJP trusts organization leaders for election planning in Nagpur district.

Web Summary : BJP entrusted election planning to experienced organization leaders in Nagpur, bypassing direct responsibility for representatives. Sanjay Bhende, Arvind Gajbhiye, and Dr. Rajiv Potdar are election chiefs, supervised by MLA Praveen Datke, focusing on local body elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.