भाजपची हॅट्ट्रिक की काँग्रेसची वापसी?
By Admin | Updated: January 12, 2017 01:31 IST2017-01-12T01:31:45+5:302017-01-12T01:31:45+5:30
महापालिका निवडणुकीचा बिगुल बुधवारी वाजताच सारेच पक्ष विजयासाठी सज्ज झाले.

भाजपची हॅट्ट्रिक की काँग्रेसची वापसी?
बसपा करणार का यावेळी मॅजिक ?
नागपूर : महापालिका निवडणुकीचा बिगुल बुधवारी वाजताच सारेच पक्ष विजयासाठी सज्ज झाले. भाजपा विकास कामांचा हवाला देऊन तर काँग्रेस भाजपच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून मतदारांपुढे जाणार आहे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन २३ फेब्रुवारीला मतमोजणीनंतर नागपूरकरांनी कुणाला कौल दिला हे कळेल. भाजपला ‘हॅट्ट्रिक ’ साधण्यात यश मिळते की महापालिकेत काँग्रेसची वापसी होते, हे देखील स्पष्ट होईल. एवढेच नव्हे तर दोन वर्षांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचाही अंदाज या निकालातून येणार आहे. महापालिकेत गेल्या १० वर्षांपासून असलेली सत्ता टिकविण्याचे भाजपसमोर आव्हान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ही निवडणूक असल्यामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचेच नव्हे तर देशाचे या निवडणुकीकडे लक्ष आहे. भाजपला शंभराहून अधिक जागा जिंकत ‘हॅट्ट्रिक ’ करून देशात संदेश द्यायचा आहे. दुसरीकडे गेल्या दहा वर्षांचा वनवास संपविण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. विविध पक्षातील सात नगरसेवक पक्षात आल्याने काँग्रेसची हिंमत वाढली आहे. बसपादेखील ताकदीने रिंगणात उतरणार आहे. १२ नगरसेवकांहून ५० वर झेप घेण्याचा त्यांचा इरादा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची स्थिती सारखी आहे. आघाडी व युती बाबत चित्र स्पष्ट नसल्यामुळे सध्यातरी त्यांना स्वबळावरच पुढे सरकावे लागत आहे. मनसेलाही गळती लागली आहे. चार सदस्यीय प्रभागात या पक्षांसमोर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.
महापालिकेच्या माध्यमातून गत दहा वर्षात शहरात केलेली विकास कामे, गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहराचा होत असलेला विकास, या मुद्यावर आम्ही मतदारांपुढे जात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठिशी पुन्हा एकदा शहरातील जनता ठामपणे उभी राहील, असा विश्वास आहे. - प्रवीण दटके, महापौर